भारत-बांगलादेशमध्ये ‘सीईपीए’वर चर्चा होणार

‘सीईपीए’ढाका – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना पुढच्या महिन्यात भारताच्या भेटीवर येत आहेत. कोरोनाची साथ व त्यानंतर पेटेले युक्रेनचे युद्ध याचा विपरित परिणाम बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेवरही झाला असून या पुढच्या काळात इथे श्रीलंकेसारखी अवस्था पहायला मिळू शकते, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. बांगलादेशच्या परकीय गंगाजळीत झालेली घट याची साक्ष देत आहे. यामुळे पंतप्रधान शेख हसिना यांचे सरकार धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत सहाय्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान भारताकडे धाव घेत असल्याचे निष्कर्ष काही विश्लेषकांनी नोंदविलेले आहेत.

६ ते ७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान शेख हसिना भारताला भेट देतील. दोन्ही देशांमध्ये ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट-सीईपीए’वर लवकरच वाटाघाटी सुरू होतील. त्यासाठी आवश्यक असलेली परवानगी पंतप्रधान हसिना यांनी नुकतीच दिली होती. आत्तापर्यंत बांगलादेशने कुठल्याही देशाबरोबर अशा स्वरुपाचा व्यापाक आर्थिक सहकार्य करार केलेला नाही. त्यामुळे भारत हा बांगलादेशचा असे सहकार्य असलेला पहिला देश बनू शकतो. अशा स्वरुपाचा करार बांगलादेशाने आधी आपल्याशी करावा, यासाठी चीनची धडपड सुरू होती. मात्र श्रीलंका आणि पाकिस्तानबरोबरील चीनच्या आर्थिक सहकार्याचे या देशांवर झालेले दुष्परिणाम लक्षात घेऊन बांगलादेशने यासाठी भारताला प्राधान्य दिले आहे.

भारताबरोबर सीईपीए करार झाला तर त्यामुळे बांगलादेशची निर्यात १९० टक्क्यांनी वाढू शकते. तर भारताची बांगलादेशातील निर्यात याने १८८ टक्क्यांने वाढणार आहे. सध्याच्या परिस्थितीत बांगलादेशला याची फार मोठी आवश्यकता आहे. त्याचवेळी बांगलादेशाबरोबरील सहकार्याचा लाभ भारतालाही मिळेल.

leave a reply