वॉशिंग्टन – चीन आणि पाकिस्तानबरोबरील भारताच्या संघर्षाची शक्यता बळावल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने केला आहे. अमेरिकन संसदेला दिलेल्या अहवालात ‘नॅशनल इंटेलिजन्स’ने चीनबरोबरील एलएसी व पाकिस्तानबरोबरील एलओसीवरील तणाव कायम असल्याचा निष्कर्ष नोंदवून इथे संघर्ष पेट घेईल, अशी चिंता व्यक्त केली. भारताचे आक्रमक नेतृत्त्व कुठल्याही प्रकारची आगळीक खपवून घेणारे नसल्याचे ही संघर्षाची शक्यता अधिकच वाढल्याचा दावा सदर अहवालात करण्यात आला आहे.
पाकिस्तान भारतात फार मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणू शकतो. किंवा जम्मू व काश्मीरमध्ये हिंसक कारवाया करून पाकिस्तान भारताला चिथावणी देऊ शकेल. याआधी पाकिस्तानने भारतात अशा कारवाया केल्या होत्या. मात्र यावेळी भारताचे नेतृत्त्व पाकिस्तानच्या या कारवाया खपवून घेणार नाही. भारत पाकिस्तानवर लष्करी कारवाई करून याला प्रत्युत्तर देईल, असा दावा अमेरिकेच्या डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स’च्या वार्षिक अहवालात करण्यात आला आहे. याबरोबरच भारत व चीनमधील एलएसीवरील परिस्थितीही संवेदनशील बनलेली आहे, याकडे सदर अहवालात लक्ष वेधण्यात आले.
२०२० साली गलवान खोऱ्यात भारत व चीनच्या लष्करामध्ये चकमक झडली. यानंतर इथली परिस्थिती तणावपूर्ण बनलेली आहे. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या चर्चा झालेल्या आहेत. तरीही भारत व चीनने या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात तैनाती करून ठेवलेली आहे. त्यामुळे इथे संघर्ष झडण्याची दाट शक्यता आहे. दोन अण्वस्त्रधारी देशामधील संघर्ष अमेरिकेच्या हितसंबंधांना थेट धक्का देणारा ठरेल, असे सदर अहवालात बजावण्यात आले आहे. म्हणूनच अमेरिकेने दोन्ही देशामध्ये मध्यस्थाची भूमिका पार पाडावी, असा सल्ला या अहवालातून देण्यात आलेला आहे.
दरम्यान, गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत व चीनमधील संबंध सुरळीत नसल्याचे भारताने वारंवार स्पष्ट केले होते. मात्र असे असले तरी दोन्ही देशांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी कुणाही तिसऱ्या मध्यस्थाची आवश्यकता नाही, असे भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आधीच स्पष्ट केले होते. त्यांचे हे विधान चीनच्या राष्ट्रीय माध्यमांनी उचलून धरले होते. सीमावाद सोडविण्यासाठी आवश्यक असलेली प्रगल्भता भारत व चीनकडे आहे, असा दावा चीनच्या सरकारी माध्यमांनी केला होता.
हिंदी