रशियाच नाही, इतर साम्राज्यांचे हितसंबंधही युक्रेनच्या युद्धात गुंतले आहेत

- ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचा ठपका

व्हॅटिकन सिटी- युक्रेनच्या युद्धाला केवळ रशियाच नाही, तर इतर साम्राज्ये देखील जबाबदार ठरतात, असे ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू आदरणीय पोप फ्रान्सिस यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पोप फ्रान्सिस यांनी युक्रेनच्या युद्धाचे खापर एकट्या रशियावर फोडता येणार नाही, याची जाणीव करून दिली. अद्याप प्रसारित न झालेल्या या मुलाखतीचा काही अंश माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. पोप फ्रान्सिस यांनी आपण शांती प्रस्थापित करण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमिर पुतिन यांच्याशी बोलण्यास तयार असल्याचे या मुलाखतीत सांगितल्याचा दावा माध्यमांनी केला आहे.

रशियाच नाही, इतर साम्राज्यांचे हितसंबंधही युक्रेनच्या युद्धात गुंतले आहेत - ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचा ठपकायुक्रेनचे युद्ध सुरू झाल्यापासून पोप फ्रान्सिस या हिंसाचाराने आपण व्यथित झाल्याचे म्हटले होते. हे युद्ध लवकरात लवकर थांबवा आणि जनतेच्या यातना संपवा, असे आवाहन पोप फ्रान्सिस यांनी अनेकवार केल होते. त्याचवेळी युक्रेनला नाटोमध्ये सहभागी करून घेण्याची तयारी करून अमेरिका व इतर युरोपिय देशांनी रशियाच्या दारापर्यंत धडक मारल्याची टीका पोप फ्रान्सिस यांनी केली होती. यामुळे रशियाने हे युद्ध पुकारले, त्यामुळे रशियाला ही चिथावणी देणारे युक्रेनच्या युद्धाला जबाबदार आहेत, असे पोप फ्रान्सिस यांनी बजावले होते. त्यांच्या या विधानांवर अमेरिका व युक्रेनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.

शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार ‘आरएसआय’ नावाच्या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही पोप फ्रान्सिस यांनी युक्रेनच्या युद्धाबाबत लक्षणीय विधाने केली. ही मुलाखत रविवारी प्रसारित होणार आहे. त्याआधीच या मुलाखतीचा काही भाग माध्यमांमध्ये आला. यात देखील पोप फ्रान्सिस यांनी युक्रेनच्या युद्धाचे खापर एकट्या रशियावर फोडता येणार नाही, असे स्पष्ट केले. या युद्धाला रशियन एम्पायर अर्थात रशियन साम्राज्य जबाबदार नाही, तर इतर साम्राज्ये देखील या युद्धाला जबाबदार आहेत, असे पोप फ्रान्सिस यांनी म्हटले आहे. या साम्राज्यांच्या हितसंबंधांसाठी युक्रेनचे युद्ध सुरू झाल्याचा सांगून पोप फ्रान्सिस यांनी याकडे जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

थेट उल्लेख केलेला नसला तरी पोप फ्रान्सिस यांनी अमेरिका या युद्धाला मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे संकेत दिल्याचे दिसते. अमेरिकेतील ‘इंडस्ट्रीयल मिलटरी कॉम्प्लेक्स’ अर्थात शस्त्रास्त्रे व लष्कराशी निगडीत असलेल्या उद्योगांची मालकी असलेल्या धनाढ्य व प्रभावशाली व्यक्तींनी युक्रेनचे युद्ध पेटवून दिले. यातून त्यांनाच मोठे लाभ मिळतील, अशी टीका अमेरिकेतूनच केली जात आहे. तर काही नेते, सामरिक विश्लेषक व बुद्धिमंतांनी ‘इंडस्ट्रीयल मिलटरी कॉम्प्लेक्स’च्या प्रभावाखाली असलेल्या अमेरिकेची मानसिकता साम्राज्यवादीच बनल्याचा आरोप केला आहे.

त्या पार्श्वभूमीवर, पोप फ्रान्सिस यांनी युक्रेनच्या युद्धात इतर साम्राज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत, असे सांगून या युद्धामागे साम्राज्यवादी मानसिकता असल्याचे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.

हिंदी English

 

leave a reply