आयएसच्या दहशतवाद्याला अटक करून अनर्थ टाळणाऱ्या रशियाचे भारताच्या संरक्षणमंत्र्यांकडून आभार

आयएसच्या दहशतवाद्यालानवी दिल्ली – भारतात येऊन आत्मघाती हल्ला चढविण्याच्या तयारीत असलेल्या आयएस’च्या दहशतवाद्याला रशियाने अटक केल्याने अनर्थ टळला होता. यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी रशियाचे आभार मानले आहेत. शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-एससीओची बैठक उझबेकिस्तानच्या ताश्कंदमध्ये सुरू आहे. इथे रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांच्याबरोबरील भेटीत भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी या कारवाईसाठी रशियाची प्रशंसा करून आभार मानले आहेत. त्याचवेळी एससीओच्या या बैठकीत पाकिस्तान व चीनच्या संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत राजनाथ सिंग यांनी सर्वच प्रकारच्या दहशतवादावर कडाडून हल्ला चढविला.

आयएस या खतरनाक दहशतवादी संघटनेने भरती केलेल्या दहशतवाद्याला रशियाच्या ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस-एफएसबी’ने ताब्यात घेतले होते. तुर्कीमधून रशियात आलेला हा दहशतवादी भारताच्या सत्ताधारी पक्षातील नेत्यावर आत्मघाती हल्ला चढविणार होता. मध्य आशियाई देशातल्या या दहशतवाद्याला तुर्कीमध्ये या आत्मघाती हल्ल्याचे प्रशिक्षण मिळाले होते. पुढील सूचना मिळेपर्यंत तो रशियात राहणार होता आणि एकदा का सूचना मिळाली की भारतात येऊन आत्मघाती हल्ला करणार होता. भारतातच त्याला या घातपातासाठी आवश्यक असलेले साहित्य पुरविले जाणार होते. पण त्याच्या आधीच एफएसबीने त्याची धरपकड केल्याने आयएसचा भयंकर कट उधळला गेला.

म्हणूनच रशियाच्या या कारवाईची दखल घेऊन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी यासाठी मित्रदेश रशियाचे आभार मानले आहेत. याबरोबरच संरक्षणमंत्र्यांनी एससीओच्या बैठकीत बोलताना दहशतवादावर कडाडून प्रहार केला. सीमेपलिकडून पुरस्कृत केल्या जाणाऱ्या दहशतवादापासून इतर कुठल्याही प्रकारचा दहशतवाद हा मानवतेच्या विरोधातील अपराधच ठरतो. त्याचा एकमुखाने निषेध झालाच पाहिजे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग म्हणाले. त्याचवेळी सर्व प्रकारच्या दहशतवादापासून आपल्या क्षेत्राला मुक्त करण्यासाठी भारत लढा देत राहिल, अशी घोषणा यावेळी संरक्षणमंत्र्यांनी केली. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांच्या उपस्थितीत भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी थेट नामोल्लेख टाळून दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्या पाकिस्तानवर घणाघाती टीका केल्याचे दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर थेट पाकिस्तानचा नामोल्लेख न करता, दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्या देशांवर भारताचे नेते व राजनैतिक अधिकारी हल्ला चढवित आहेत. थेट नामोल्लेख टाळल्याने पाकिस्तानला महत्त्व मिळत नाही आणि दहशतवाद व पाकिस्तान यांचा संबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर आधीपासूनच प्रस्थापित झाल्याने, भारताकडून पाकिस्तानलाच लक्ष्य केले जात आहे, हा संदेश साऱ्या जगाला मिळतो. भारताने अतिशय कुशलतेने आखलेल्या धोरणाचा हा भाग असून याने पाकिस्तान जेरीस आल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय परिषदा तसेच बैठकांमध्ये अशा स्वरुपाचे हल्ले चढविण्याचे भारताचे धोरण यशस्वी ठरत असून यामुळे पाकिस्तान पुरता बदनाम झाल्याची खंत या देशाचे विश्लेषक सातत्याने व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, एससीओच्या या परिषदेत बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी अफगाणिस्तानचा उल्लेख करून भारताला सुरक्षित आणि स्थिर अफगाणिस्तान अपेक्षित असल्याचे ठासून सांगितले. तसेच अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर इतर देशांच्या विरोधातील कारवायांसाठी होऊ नये, ही भारताची भूमिका संरक्षणमंत्र्यांनी यावेळी पुन्हा एकदा अधोरेखित केली. तसेच युक्रेनमधील युद्धाबाबत बोलताना संरक्षणमंत्र्यांनी इथल्या परिस्थितीवर भारताला अतिशय चिंता वाटत असल्याचे म्हटले आहे. हा प्रश्न रशिया व युक्रेन यांच्यातील राजनैतिक वाटाघाटीतूनच सुटेल, असा विश्वास यावेळी राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला.

leave a reply