भारताला अमेरिका-ब्रिटनकडून आश्वासन नाही, तर विघटनवाद्यांविरोधात कारवाईची अपेक्षा

- परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा

बंगळुरू – सॅन फ्रॅन्सिस्को आणि लंडन येथील भारताच्या दूतावासांवर झालेल्या हल्ल्यांची गंभीर दखल भारताने घेतली आहे. अमेरिका व ब्रिटनने या हल्ल्यानंतर भारताला दूतावासांच्या सुरक्षेसंदर्भात आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पण भारताला आश्वासन नाही, तर हे हल्ले चढविणाऱ्यांवर कारवाई अपेक्षित असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. तर खलिस्तानी विघटनवाद्यांच्या या भारतविरोधी कारवाया रोखण्यात अपयशी ठरलेल्या अमेरिका व ब्रिटनला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चांगलीच चपराक लगावली. आपल्या व इतरांच्या सुरक्षेकडे पाहण्याचा काही देशांचा दृष्टीकोन दुटप्पी आहे, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी फटकारले आहे.

भारताला अमेरिका-ब्रिटनकडून आश्वासन नाही, तर विघटनवाद्यांविरोधात कारवाईची अपेक्षा - परराष्ट्र मंत्रालयाचा इशारालंडनमध्ये खलिस्तानी विघटनवाद्यांकडून भारताच्या उच्चायुक्तालयासमोर निदर्शने केली जात आहेत. या उच्चायुक्तालयावर फडकत असलेला भारताचा राष्ट्रध्वज काढून घेण्यापर्यंत या विघटनवाद्यांची मजल गेली होती. मात्र भारतीय उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ब्रिटनच्या पोलीस दलाने आपले कर्तव्य पार पाडले नाही. याची गंभीर दखल घेऊन भारताने याविरोधात ब्रिटनकडे राजनैतिक पातळीवर दाद मागितली होती. त्याकडे ब्रिटनने दुर्लक्ष करून भारताची सौम्य प्रतिक्रिय गृहित धरली होती. पण नवी दिल्लीतील ब्रिटनच्या उच्चायुक्तालयाला तसेच ब्रिटनच्या उच्चायुक्तांना दिलेल्या सुरक्षेत भारताने कपात केल्यानंतर ब्रिटनचे डोळे उघडल्याचे दिसत आहे.

भारताच्या या कठोर निर्णयानंतर ब्रिटनने भारतविरोधात हिंसा खपवून घेणार नाही, असे दावे केले होते. मात्र अजूनही ब्रिटन विशेषतः लंडनचे पोलीस दल खलिस्तानी विघटनवाद्यांवर कारवाई करण्यासाठी उत्सुक नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकरणी एकाला अटक झाल्याची माहिती देऊन ब्रिटन आपले हात झटकत असल्याचे समोर आले होते. याविरोधात भारतात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. लंडनच्या पोलीस दलाच्या सौम्य कारवाईमुळे इथल्या खलिस्तानवाद्यांचा उत्साह अधिक वाढला असून ते सातत्याने भारतीय उच्चायुक्तालयासमोर निदर्शने करीत आहेत. इथले भारतीय देखील याला प्रत्युत्तर देणारी निदर्शने करीत आहेत.

अमेरिकेने देखील सॅन फ्रॅन्सिस्को येथील भारतीय दूतावासात घुसून खलिस्तानी विघटनवाद्यांनी केलेल्या मोडतोडीविरोधात विधाने केली असली, तरी धुडगूस घालणाऱ्या या खलिस्तानवाद्यांवर कारवाई केलेली नाही. हा अमेरिका व ब्रिटन यांच्या भारतविरोधी डावपेचांचा भाग असल्याचा दावा काही विश्लेषक करीत आहेत. त्याचवेळी दोन्ही देश भारताला गृहित धरत असल्याची टीका या विश्लेषकांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी भारताला आश्वासने देणाऱ्या अमेरिका व ब्रिटन यांना समज दिली. आम्हाला या देशांकडून आश्वासनांची नाही, तर भारतविरोधी शक्तींवर कारवाईची अपेक्षा असल्याचे बागची यांनी बजावले आहे. तर बंगळुरू येथील कार्यक्रमात बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिका व ब्रिटनच्या दुटप्पीपणावर नेमके बोट ठेवले. काही देशांचे आपल्या व इतरांच्या सुरक्षेबाबतचे धोरण दुटप्पी असते, असा टोला जयशंकर यांनी लगावला. अमेरिकेतील भारताचा दूतावास व लंडनमधील उच्चायुक्तालयाला सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी पार पाडण्यात आलेली नाही, असे सांगून यासाठी जयशंकर यांनी अमेरिका व ब्रिटनला जबाबदार धरले.

नवी दिल्लीतील ब्रिटनच्या उच्चायुक्तालयाची सुरक्षा कमी करून भारताने ब्रिटनला परिणामांची जाणीव करून दिली आहे. यानंतरही ब्रिटनने आपल्या धोरणात बदल करून खलिस्तानी विघटनवाद्यांबाबत सहानुभूती दाखवली, तर द्विपक्षीय संबंधांवर त्याचे परिणाम होतील, असा संदेश भारताने दिला आहे. त्याचवेळी खलिस्तानचा मुद्दा उपस्थित करून भारतावर दबाव टाकण्याची खेळी यशस्वी ठरणार नाही, याची सुस्पष्ट जाणीव भारत अमेरिका आणि ब्रिटनला करून देत आहे.

हिंदी English

 

leave a reply