भारताकडील परकीय गंगाजळी 600 अब्ज डॉलर्सवर

मुंबई – 1991 साली देशाकडील परकीय गंगाजळी सहा अब्ज डॉलर्सच्या खाली गेल्याने भारताला सोने गहाण ठेवावे लागले होते. त्यानंतर सुमारे 30 वर्षांनंतर भारताकडील परकीय गंगाजळी 600 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. गेल्या सात वर्षात भारताच्या परकीय गंगाजळीत दुप्पटीने वाढ झाली असून देशाकडील या मजबूत परकीय चलनसाठ्याचा फायदा येत्या काळात भारताला होईल. भारतीय अर्थव्यवस्थेवरील गुंतवणूकदारांचा विश्‍वास अधिक वाढेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शुक्रवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी देेशाकडील परकीय गंगाजळी 600 अब्ज डॉलर्सवर पोहोचल्याचा अंदाज वर्तविला. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भातील आकडेवारीही प्रसिद्ध केली यानुसार 28 मे रोजी संपलेल्या आठवड्यात देशाकडील परकीय गंगाजळी 598.2 अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती, तर शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात ही गंगाजळी 600 अब्जाच्या पुढे गेल्याचे अंदाज आरबीआयकडून व्यक्त करण्यात आला. याचे तपशिल नंतर जाहीर करण्यात येणार आहेत.भारताकडील परकीय गंगाजळी 600 अब्ज डॉलर्सवर

याआधी 21 मे ला संपलेल्या आठवड्यात देशाकडील परकीय गंगाजळी 592.9 अब्ज डॉलर्सवर गेली होती. यानुसार 21 मे ते 28 मे दरम्यान देशाच्या परकीय गंगाजळीत तब्बल 5.3 अब्ज डॉलर्स इतकी भर पडली. भारत 600 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गंगाजळी असलेला पाचवा देश आहे. सध्या केवळ चीन, जपान, स्वित्झर्लंड, रशिया या देशांकडेच 600 अब्ज डॉलर्सहून अधिक परकीय गंगाजळी आहे.

गेल्या सात वर्षात देशाकडील परकीय गंगाजळीत दुप्पटीहून अधिक भर पडली आहे. मे 2014 सालात देशाकडे 312.38 अब्ज डॉलर्सची परकीय गंगाजळी होती. तेच गेल्या दोन वर्षात देशाकडील परकीय गंगाजळी 179 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. 2019 च्या मे महिन्याच्या अखेरीला भारताकडील परकीय गंगाजळी 421.86 अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती.

कोरोनाच्या संकटातही भारताच्या परकीय गंगाजळीमध्ये सतत वाढ होत राहिली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात देशात कोरोनामुळे पहिल्यांदा लॉकडाऊन लावण्यात आला. त्यानंतर अर्थिक उलाढालीवर प्रचंड परिणाम झाला होता. गेल्यावर्षी मार्च अखेरीपर्यंत भारताची परकीय गंगाजळी 475.56 अब्ज डॉलर्स इतकी होती. थोडक्यात गेल्या एप्रिलपासून यावर्षीच्या मार्चपर्यंत सव्वाशे अब्ज डॉलर्सने भारताकडील परकीय गंगाजळी वाढली आहे.

विक्रमी पातळीवर पोहोचलेली देशाकडील ही परकीय गंगाजळीचा भारताला मोठा लाभ होणार आहे. यामुळे भारतीय चलनाचे मूल्य स्थिर राहण्यास मदत मिळेल. तसेच यामुळे भारतात गुंतवणूक करू इच्छिणार्‍यांचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरील विश्‍वास वाढेल. यामुळे भारतात अधिक परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल.

भारताला 1991 साली आर्थिक डोलारा सावरण्यासाठी आपल्याकडील 47 टन सोने गहाण ठेवावे लागले होते. आज भारताकडे एकावर्षाहून अधिक आयात करता येईल इतके परकीय चलन गंगाजळीमध्ये आहे. यामुळे?भारतीय बाजारातील अस्थिरताही कमी होणार आहे.

leave a reply