शेजारी देशांपासून असलेल्या धोक्यांविरोधात भारत सज्ज आहे – संरक्षणदलप्रमुख जनरल रावत

नवी दिल्ली – भारत एलएसीवरील तणाव वाढविण्याच्या प्रयत्नात असल्याचे आरोप चीनकडून केले जात आहेत. पण प्रत्यक्षात चीनपासूनच भारताला धोका संभवतो, असे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी बजावले आहे. वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत जनरल रावत यांनी चीन व पाकिस्तानचा संदर्भ देऊन भारताला दोन्ही बाजूंनी धोका असल्याचे मान्य केले. पण आपल्या मोठ्या शेजारी देशाची क्षमता लक्षात घेऊन भारत आपली सज्जता वाढवित आहे, असे संरक्षणदलप्रमुख म्हणाले. त्याचवेळी लडाखच्या एलएसीवर 2020 सालच्या एप्रिल महिन्यापूर्वीची परिस्थिती निर्माण झाल्याखेरीज इथला तणाव कमी होणार नाही, अशा शब्दात जनरल रावत यांनी चीनला समज दिली.

जनरल रावतगेल्या काही दिवसांपासून चीनने भारताबाबत दुहेरी धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. राजनैतिक पातळीवर चीन भारताला शांतता, सहकार्याचा संदेश देत आहे. चीनचे भारतातील राजदूत तर दोन्ही देशांमध्ये संघर्ष नको, सहकार्य हवे, असे सांगत आहेत. तर दुसर्‍या बाजूला लडाखच्या एलएसीजवळ चीन हवाई सराव करून भारताला इशारे देत आहे. चीनचे सरकारी मुखपत्र भारतावरच युद्धखोरीचे बेलगाम आरोप करून गंभीर परिणामांच्या धमक्या देत आहे. अशा परिस्थितीत चीनची प्रलोभने व धमक्या या दोन्हींचा आपल्या निर्धारावर परिणाम होणार नाही, असा संदेश भारताकडून दिला जात आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी परखड शब्दात चीनला याची जाणीव करून दिलेली आहे. आता संरक्षण दलप्रमुख जनरल रावत यांनी देखील माध्यमांशी बोलताना चीनला कडक शब्दात समज दिली.

‘दोन्ही सीमांवरून भारताला आव्हाने मिळत आहेत. पण भारत आपल्या मोठ्या शेजारी देशाकडे अधिक सावधपणे पाहत आहे. अधिक लष्करी क्षमता, प्रगत तंत्रज्ञान असलेल्या देशाविरोधात भारताने पूर्ण सज्जता ठेवलेली आहे’, अशा शब्दात जनरल रावत यांनी देशाची भूमिका मांडली. दरम्यान, पुढच्या आठवड्यात एलएसीचा वाद सोडविण्यासाठी भारत व चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांची बैठक होणार आहे. या बैठकीत लडाखच्या एलएसीवर एप्रिल 2020 पूर्वीची यथास्थिती प्रस्थापित करण्याचे ध्येय भारतासमोर आहे. चीनला याची पूर्ण कल्पना देण्यात आलेली आहे, अशी माहिती जनरल रावत यांनी दिली. हे ध्येय गाठण्यात यश मिळाले, तर एकमेकांवरील विश्‍वास निदान काही प्रमाणात तरी प्रस्थापित होईल, असे सूचक विधान जनरल रावत यांनी केले.

यामुळे एलएसीचा वाद अधिक चिघळणार नाही, याचे समाधान मिळू शकेल, याकडे संरक्षणदलप्रमुखांनी लक्ष वेधले. चीनबरोबरच भारताला पाकिस्तानपासून संभवणार्‍या धोक्यावरही जनरल रावत यांनी महत्त्वपूर्ण विधाने केली आहे. भारताच्या या बाजूला लाभलेला शेजारी देश स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारा आहे. या देशातले दहशतवादी अनावर होतात आणि ते भारतात घातपात माजवतात किंवा कारगिलसारखी परिस्थितीही निर्माण केली जाते. पुन्हा अशी स्थिती उद्भवली तर या शेजारी देशाकडूनही फार मोठे आव्हान समोर येईल, असे जनरल रावत म्हणाले.

पाकिस्तानला भारताच्या सीमेवर संघर्षबंदी हवी असेल, तर ही संघर्षबंदी सर्वच आघाड्यांवर लागू व्हायला हवी. पाकिस्तानने दहशतवाद्यांना सहाय्य देऊ न देणे हा देखील या संघर्षबंदीचाच भाग ठरतो. तसे झाले नाही, तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय संरक्षणदलांनी तयारी ठेवलेली आहे, याची जाणीव संरक्षणदलप्रमुखांनी करून दिली.

leave a reply