हिंदी महासागरात भारत- जपानच्या नौदलांचा युद्धसराव

नवी दिल्ली – चीनबरोबर तणाव वाढलेला असताना भारत आणि जपानच्या नौदलांचा युद्धसराव हिंदी महासागरात पार पडला. हा युद्धसराव दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या नियमित सरावाचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. मात्र एकीकडे भारताच्या लडाखमधील घुसखोरीवरून आणि दुसरीकडे जपानचा ‘ईस्ट चायना सी’मध्ये चीनच्या हालचालींवरून तणाव वाढलेला असताना हा युद्धसराव पार पडला आहे. त्यामुळे भारत आणि जपानच्या नौदलामधील युद्धसरावासाठी निवडलेली वेळ म्हणजे चीनला दोन्ही देशांनी दिलेला इशारा ठरतो, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. चारच दिवसांपूर्वी अमेरिका आणि जपानच्या नौदलांमध्येही ‘साऊथ चायना सी’मध्ये युद्धसराव झाला होता. त्यानंतर भारत आणि जपानमध्ये झालेला युद्धसराव पार पडत आहे, याकडेही विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

Hindi-Mahasagar-exerciseभारतीय नौदलाच्या ‘आयएनएस राणा’ आणि ‘आयएनएस कुलूश’ या दोन विनाशिका आणि जपानच्या ‘जेएस काशिमा’ व ‘जेएस शिमायुकी’ या युद्धनौका युद्धसरावात सहभागी झाल्या होत्या. हिंदी महासागरात कोणत्या भागात हा सराव पार पडला याचे तपशील जाहीर करण्यात आलेले नाहीत. दोन्ही देशांमध्ये पार पडलेल्या या युद्धसरावाची माहिती भारतातील जपानच्या दूतावासाकडून उघड करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षातील दोन्ही देशांमध्ये झालेला हा १५ वा युद्धसराव होता, असेही जपानच्या दूतावासाने म्हटले आहे. दोन्ही देशांच्या नौदलांमध्ये परस्पर समन्वय वाढविणे, हा युद्धसरावाचा उद्देश होता. त्यामागे कोणती विशेष पार्श्वभूमी नव्हती, असा खुलासा जपानच्या दूतावासाने केला आहे.

लडाखच्या सीमाभागात भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर खडे ठाकले आहे. तसेच चीन पॅसिफिक क्षेत्रातील देशांच्या सागरी सीमांमध्येही सतत घुसखोरी करीत आहे. इथला चीनच्या पाणबुड्या आणि युद्धनौकांचा वावर वाढला आहे. जपानने सेंकाकू बेट समूहाबाबत घेतलेल्या निर्णयावरून चीनने जपानला धमकावले आहे. त्याचवेळी तैवानला चीनकडून असलेला धोका लक्षात घेऊन अमेरिकेने एकाच वेळी आपल्या तीन विमानवाहू युद्धनौकांची तैनाती चीन नजीकच्या सागरी क्षेत्रात केली आहे. त्याचवेळी भारतीय नौदल आणि जपानच्या नौदलांमध्ये झालेल्या या युद्धसरावाचे महत्व वाढले आहे.

Hindi-Mahasagarभारताने चीनबरॊबर तणावात वाढ झाल्यावर हिंदी महासागर क्षेत्रातील आपली तैनाती वाढविली आहे. तसेच अमेरिका, जपानबरॊबर होणाऱ्या मलबार युद्धसरावात येत्या काळात ऑस्ट्रेलियालाही सामील करून घेण्याचे संकेत भारताने दिले होते. तसेच काही दिवसांपूर्वीच भारत आणि ऑस्ट्रोलियामध्ये ‘लॉजिस्टिक’ करार संपन्न झाला आहे. या स्वरूपाचा करार भारताने याआधीच अमेरिकेबरोबर केला होता. जपानबरोबरही लवकरच असा करार होईल असे संकेत मिळत आहेत. यामुळे भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या ‘क्वाड’ देशांमध्ये सहकार्य खूपच भक्कम होत असल्याचे दिसून येते. यामुळेही चीन धास्तावलेला आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, भारताचे माजी राजनैतिक अधिकारी आणि चीनविषयक अभ्यासक सुजाण आर. चिनॉय यांनी भारताने अंदमान निकोबार बेटे आपल्या मित्र देशांसाठी खुली करायला हवीत, असा सल्ला दिला आहे. मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेंन्स स्टडीज् अँड ॲनालिसिस या अभ्यासगटाचे महासंचालक असलेल्या चिनॉय यांनी हिंदी महासागरात चीनच्या पाणबुड्यांच्या वावर रोखण्यासासाठी लगाम कसण्यासाठी अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स या मित्र देशांबरोबर सहकार्य या रीतीने अधिक मजबूत करावे, असे म्हटले आहे. चीनने म्यानमार, बांगलादेश, थायलंड आदी देशांबरोबर करार केले असून यामुळे चीनच्या पाणबुड्या या देशांच्या बंदरावर नियमित येत असतात, याकडे लक्ष वेधताना भारतानेही आपल्या मित्र देशांबरोबर सहकार्य वाढवून चीनला लगाम घालावा, असे चिनॉय यांनी सुचविले आहे.

leave a reply