भारत-मालदीवमध्ये संरक्षण सहकार्य करार

माले – मालदीवच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून चीनच्या ‘वन बेल्ट वन रोड’ योजनेला हादरे दिल्यानंतर भारताने मालदीवबरोबर पाच कोटी डॉलर्सचा संरक्षण सहकार्य करार केला आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या मालदीव दौर्‍यात उभय देशांमध्ये हा करार पार पडला. मालदीव हा भारताचा विकासातील तसेच संरक्षणातील भागीदार देश असल्याची घोषणा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यावेळी केली. तर भारत हा आपल्या देशाचा विश्‍वासू सहकारी देश असल्याचे मालदीवच्या संरक्षणमंत्री मारिया दिदी यांनी म्हटले आहे.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर चार दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. जयशंकर यांनी मालदीवपासून आपल्या या दौर्‍याची सुरुवात करून या देशाबरोबर वेगवेगळे करार केले आहेत. यामध्ये संरक्षण क्षेत्राच्या विकासासाठी मालदीवला पाच कोटी डॉलर्सची ‘लाईन ऑफ क्रेडिट’ भारताने दिली आहे. याअंतर्गत मालदीव भारताकडून आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक संरक्षण साहित्यांची खरेदी करू शकतो. याचा फायदा मालदीवबरोबरच भारताच्या सुरक्षेसाठी देखील होणार आहे.

त्याचबरोबर दहशतवादविरोधी सहकार्यावरही उभय देशांमध्ये यावेळी चर्चा पार पडली. भारत आणि मालदीवमधील सागरी क्षेत्राचा वापर दहशतवादी कारवाईसाठी होऊ नये, यावर परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि संरक्षणमंत्री दिदी यांच्यात एकमत झाले. याबरोबरच सार्वजनिक प्रसारण, शहरी विकास, रस्ते आणि घरांचे बांधकाम यासंबंधीचे सहकार्य करार दोन्ही देशांमध्ये झाले आहेत. याआधी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारताने मालदीवच्या पायाभूत सुविधांमध्ये ५० कोटी डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती.

चीनने मालदीवमध्ये सत्ताबदल घडवून हा देश आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. मात्र यात चीनला अपयश आले होते. आत्ताही कोरोनाची साथ तसेच अंतर्गत वादाचा लाभ उचलून मालदीवला आपल्या कर्जाच्या फासात अडकविण्याची तयारी चीनने केली होती. चीनच्या ‘वन बेल्ट वन रोड’ (ओबीओआर) या प्रकल्पासाठी मालदीव अतिशय महत्त्वाचा देश ठरतो, त्यासाठी चीन मोठी किंमत मोजण्यास तयार आहे. पण भारताने मालदीवमध्ये सुमारे ५० कोटी डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करून चीनच्या हादरा दिला होता. मालदीवच्या नेत्यांनी देखील भारताच्या या गुंतवणूकीचे स्वागत करून भारत हा आपला विश्‍वासू सहकारी देश असल्याचे म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर, भारताच्या मालदीवबरोबरील सहकार्याला सामरिक महत्त्व आले आहे. मालदीवच्या दौर्‍यानंतर परराष्ट्रमंत्री जयशंकर सोमवारी मॉरिशसमध्ये दाखल होतील.

leave a reply