दक्षिण कोरियाच्या इंडो-पॅसिफिक धोरणात भारताला महत्त्वाचे स्थान

- दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री पार्क जीन

नवी दिल्ली – यावर्षी भारत आणि दक्षिण कोरियाच्या राजनैतिक संबंधांना ५० वर्ष पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री शुक्रवारी भारताच्या भेटीवर आले. दक्षिण कोरियाच्या ‘इंडो-पॅसिफिक स्ट्रॅटेजी’मध्ये भारत हा अत्यंत महत्त्वाचा देश असल्याचे लक्षवेधी विधान यावेळी परराष्ट्रमंत्री पार्क जीन यांनी केले. त्याचवेळी भारत व दक्षिण कोरियाच्या संबंधांना हजारो वर्षांचा वारसा लाभलेला आहे, असे सांगून परराष्ट्रमंत्री पार्क जीन यांनी लोकशाही हा देखील दोन्ही देशांना जोडणारा समान दुवा असल्याची बाब लक्षात आणून दिली.

दक्षिण कोरियाच्या इंडो-पॅसिफिक धोरणात भारताला महत्त्वाचे स्थान - दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री पार्क जीनशुक्रवारी नवी दिल्लीत दाखल झालेल्या दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री पार्क जीन यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेऊन चर्चा केली. यात उभय देशांमधील धोरणात्मक भागीदारी व्यापक करण्याचा मुद्दा अग्रक्रमावर होता. व्यापार, गुंतवणूक व उत्पादनाशी निगडीत असलेली पुरवठा साखळी स्थिर राखण्यावर तसेच दुर्मीळ खनिजांवर दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा झाल्याचे सांगितले जाते. तसेच भारत व दक्षिण कोरिया आर्टिफिशल इंटेलिजन्स, बिग डाटा, बायोटेक्नॉलॉजी तसेच अंतराळ क्षेत्रात सहकार्य अधिक वाढविण्यासाठी उत्सुक आहेत, असे परराष्ट्रमंत्री पार्क जीन यावेळी म्हणाले.

इंडो-पॅसिफिक व त्याच्या पलिकडील क्षेत्र देखील खुले, मुक्त व स्वतंत्र असावे आणि इथे समृद्धी नांदावी याकरीता दक्षिण कोरिया आपली भूमिका पार पाडण्यासाठी तयार आहे. दक्षिण कोरियाच्या या इंडो-पॅसिफिकविषयक भूमिकेत भारत हा अत्यंत महत्त्वाचा देश ठरतो, असे परराष्ट्रमंत्री पार्क जीन पुढे म्हणाले. यासंदर्भात भारत व दक्षिण कोरियाचे हितसंबंध एकसमान असल्याची जाणीव पार्क जीन यांनी करून दिली. त्याचवेळी पुरवठा साखळी विकस्कळीत झाल्याने समोर खड्या ठाकलेल्या आव्हानांचाही दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी उल्लेख केला. युक्रेनचे युद्ध, कोरोनाची साथ आणि हवामानबदलामुळे आलेल्या आव्हानांचा दाखला यावेळी पार्क जीन यांनी दिला.

या पार्श्वभूमीवर भारत व दक्षिण कोरियाचे सहाय्य अत्यंत महत्त्वाचे ठरते, याकडे पार्क जीन यांनी लक्ष वेधले. दरम्यान, सध्या कोरियन क्षेत्रात तणाव पसरला असून उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाला अणुहल्ल्याच्या धमक्या दिल्या आहेत. या धमक्या पोकळ नाहीत, हे उत्तर कोरिया नव्या अणुचाचणीची तयारी करून दाखवून देत आहे. तर आपल्या संरक्षणासाठी दक्षिण कोरियाने अमेरिकेबरोबरील युद्धसरावांची तीव्रता वाढविली आहे. यामुळे उत्तर कोरियाच्या आक्रमकतेत अधिकच वाढ झालेली आहे. उत्तर कोरियाच्या या हालचालींमागे चीनची व्यूहरचना असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अशा परिस्थितीत दक्षिण कोरिया व जपान आपले पारंपरिक वैर विसरून चीन व उत्तर कोरियाच्या धोक्याविरोधात एकत्र आले आहेत. त्याचवेळी जपान व उत्तर कोरिया भारताबरोबरील आपले धोरणात्मक सहकार्य वाढवून चीनच्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील वर्चस्ववादी कारवायांना प्रत्युत्तर देत आहेत.

या पार्श्वभूमीवर, दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची ही भारतभेट लक्षणीय ठरते. दोन्ही देशांमध्ये आता संरक्षणविषयक सहकार्य देखील व्यापक होऊ लागले असून दक्षिण कोरिया भारताला शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याची निर्यात करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. परराष्ट्रमंत्री पार्क जीन यासंदर्भात भारताच्या संरक्षणमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे दावे केले जातात.

हिंदी

 

leave a reply