संकटाच्या काळात भारताचे श्रीलंकेला ४० कोटी डॉलर्सचे सहाय्य

संकटाच्या काळात भारताचे श्रीलंकेला ४० कोटी डॉलर्सचे सहाय्य

कोलंबो – कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. याआधी भारताने श्रीलंकेला हाइड्रोक्सोक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा केला होता. आता भारत श्रीलंकेच्या कमी होत चाललेल्या परकीय गंगाजळीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी श्रीलंकेबरोबर ४० कोटी डॉलर्सच्या चलनाची अदलाबदल करणार आहे. श्रीलंकन सरकारने यासाठी भारताकडे साहाय्य मागितले होते.

श्रीलंकेत गेल्या महिन्याभरापेक्षा जास्त काळ कर्फ्यू लागू आहे. मध्यंतरी हा कर्फ्यू उठविण्यात आला होता. मात्र कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळल्यावर पुन्हा कर्फ्यू लागू करण्यात आला. मुख्यतः पर्यटनावर अवलंबून असलेल्या श्रीलंकेची अर्थव्यवस्था यामुळे डबघाईला आली आहे. जनतेच्या प्राथमिक गरजा, आरोग्य सुविधा पुरविणे श्रीलंकेच्या सरकारसमोर आव्हान असून यामुळे सरकारचा खर्च अधिकच वाढला आहे. तसेच बॅंकांमध्येही अतिरिक्त गुंतवणूक करावी लागत आहे. याशिवाय श्रीलंकेची आयातही वाढली आहे. पण देशाला परकीय चलन मिळणे जवजवळ बंद झाले आहे. यामुळे परकीय गंगाजळी घटली आहे. याचा परिणाम डॉलर्सच्या तुलनेत श्रीलंकन रुपयाचे मूल्य घसरू लागले असून अर्थव्यवस्था आणखी संकटात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे परकीय गंगाजळी टिकवून ठेवून श्रीलंकन रुपयांची घसरण थांबविण्यासाठी श्रीलंकेने भारताकडे मदत मागितली होती.

साधारण असे संकट असले, तर सरकारे खुल्या बाजारातून डॉलर्स खरेदी करतात किंवा कर्जावर डॉलर्स खरेदी करून परकीय गंगाजळीची पातळी राखून ठेवतात. पण हे उपाय श्रीलंकेला सध्या शक्य नाहीत. यामुळे आधीच भरमसाठ व्याजाच्या चिनी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या श्रीलंकेला नव्या कर्जामुळे व्याजाचा भार उचलावा लागला असता. त्यामुळे भारताबरोबर करन्सी स्वॅप अर्थात चलनाच्या अदलाबदलीचा मार्ग निवडण्यात आला आहे.

यानुसार श्रीलंकन रुपयाच्या सध्याच्या विनिमय दारावर अर्थात एक्सचेंज रेटवर भारत श्रीलंकेला ४० कोटी डॉलर्स देणार आहे. त्यानंतर या संकटातून बाहेर पडल्यावर उलटा व्यवहार होणार असून श्रीलंका भारताला ४० कोटी डॉलर्स परत करून आपले चलन परत घेणार आहे. भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि श्रीलंकन सरकारमध्ये हा करार होईल. शुक्रवारी श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पंप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली.

‘हा करार देशाची परकीय गंगाजळी मजबूत करण्यासाठी करण्यात येणार आहे. यामुळे काही कालावधीपुरत्या देशाच्या गरजा पूर्ण करणे शक्य होईल,’ अशी माहिती श्रीलंकेचे माहिती आणि प्रसारण मंत्री बंडाला गुणवर्धना यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क देशांच्या प्रमुखांशी टेलीकॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता आणि कोरोनाच्या आपत्तीत या देशांना सहाय्याचा हात पुढे केला होता. भारताच्याच पुढाकाराने कोविड-१९ फंड स्थापन करण्यात आला. यातून सार्क देशांना कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी सहाय्य पुरविण्यात येत आहे. संकटाच्या काळात सार्क देशांना सहाय्याचा हात पुढे केल्याने भारताचा या देशांवरील प्रभाव वाढला आहे. सार्क देशांबरोबरील बैठकीतच श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाय राजपक्षे यांनी श्रीलंकेसमोरील आर्थिक संकटाची जाणीव भारताला करून दिली होती. या पार्श्वभूमीवर हा चलनाच्या अदलाबदलीचा करार होत आहे.

leave a reply