भारताने कोरोनाच्या तपासाची मागणी उचलून धरली

नवी दिल्ली – कोरोनाच्या उगमस्थानाविषयी तपास करण्याचे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आपल्या गुप्तचर संस्थांना दिले आहेत. त्यांच्या या घोषणेला एक दिवस उलटत नाही तोच भारताने देखील कोरोनाच्या उगमाचा तपास व्हावा, ही मागणी उचलून धरली आहे. भारतीय विश्‍लेषक तर कोरोनाच्या उगमाबरोबरच याच्या दुसर्‍या लाटेचाही चीनशी संबंध असल्याचे सांगून चीनबरोबर वाद असलेल्या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र बनली आहे, याकडे लक्ष वेधत आहेत. तर आपल्यावरील आरोपांमुळे अस्वस्थ झालेल्या चीनने अमेरिकेवर दोषारोप सुरू केले आहेत.

कोरोनाच्या तपासाची मागणी

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाचा उगम चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतूनच झाल्याचे ठासून सांगितले होते. आपल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी कोरोनाचा उल्लेख वुहान व्हायरस असाच केला होता. पण अमेरिकेत सत्ताबदल झाल्यानंतर बायडेन प्रशासनाने कोरोनाच्या प्रश्‍नावरून चीनला धारेवर धरण्याचे ट्रम्प यांचे धोरण बदलले. ट्रम्प यांनी सुरू केलेली कोरोनाच्या उगमाची चौकशीही बायडेन प्रशासनाने थांबविली होती. मात्र आंतरराष्ट्रीय माध्यमांनी कोरोनाचा विषाणू म्हणजे चीनचे जैविक शस्त्र असल्याचे दावे करणारे अहवाल प्रसिद्ध केले. त्यानंतर सहजासहजी नाकारता न येणार्‍या या बातम्यांचा प्रभाव दिसू लागला. जगभरात 35 लाखाहून अधिक तर अमेरिकेत सहा लाखाहून अधिकजणांचा बळी घेणार्‍या कोरोनाच्या साथीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चीनला जबाबदार धरण्याचे आपले कर्तव्य नाकारत आहेत, अशी जळजळीत टीका काही विश्‍लेषकांनी केली होती. त्याची दखल बायडेन प्रशासनाला घ्यावीच लागली.

यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी कोरोनाच्या उगमाचा तपास करण्याचा निर्णय घेऊन आपल्या गुप्तचर यंत्रणांना त्याचे आदेश दिले. मात्र कोरोनाचा फैलाव नक्की कुठून व कसा झाला, याबाबत अमेरिकी गुप्तचर यंत्रणेत मतभेद असल्याच्या बातम्याही याच काळात येत आहेत. याचा लाभ चीनला मिळू शकतो. तरीही बायडेन यांनी या साथीच्या तपासाचा निर्णय घेतल्यानंतर चीनने त्यावर जहाल प्रतिक्रिया दिलेली आहे. या निर्णयामागे राजकीय शक्ती असून दोषारोप करण्याचे राजकारण याद्वारे खेळले जात असल्याची टीका अमेरिकेतील चीनच्या दूतावासाने केली आहे. तर चीनची सरकारी माध्यमे असा निर्णय घेणार्‍या अमेरिकेवर तुटून पडली आहेत. चीनची चौकशी करण्यापेक्षा अमेरिकेच्याच जैविक प्रयोगशाळेची चौकशी व्हावी, अशी मागणी चीनचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने केली आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी कोरोनाच्या तपासाची घोषणा केल्यानंतर, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या साथीचा सखोल तपास केला जावा, अशी मागणी केली आहे. चीनचा थेट नामोल्लेख टाळून भारताने केलेली ही मागणी चीनवरील दडपण अधिकच वाढविणारी ठरते. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या उगमाचा तपास करून त्याचा अहवाल दिला होता. हा तपास म्हणजे पहिले पाऊल ठरते, याच्या पुढे जाणारा तपास करून त्याचे ठोस निष्कर्ष मांडणे अत्यंत आवश्यक ठरते, अशा नेमक्या शब्दात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देशाची भूमिका मांडली.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या उगमाबाबत केलेला तपास म्हणजे दुसरे काही नसून चीनला आरोपमुक्त करण्याचे प्रयत्न होते, अशी जगभरातून केली जात आहे. ज्यांचा चीनच्या वुहान प्रयोगशाळेशी जवळचा संबंध आहे, त्यांनाच याच्या तपासात सहभागी करून घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने आपली विश्‍वासार्हता गमावली आहे, अशी टीका होत आहे. हा प्रकार एखादा खून पाडणार्‍या मारेकर्‍यालाच त्या प्रकरणाच्या तपासात सहभागी करून घेण्यासारखा ठरतो, असे एका भारतीय विश्‍लेषकाने म्हटले आहे. तसेच ज्या देशांबरोबर सध्या चीनचे राजकीय वाद पेटलेले आहेत, त्याच देशांमध्ये कोरोनाची अधिक तीव्र दुसरी लाट कशी काय आली? असा प्रश्‍न करून या विश्‍लेषकांनी हे चीनने छेडलेले जैविक युद्धच असल्याचा दाट संशय व्यक्त केला आहे.

हाँगकाँगच्या प्रश्‍नावर ब्रिटनबरोबर चीनचा तणाव वाढला आहे. त्यानंतरच्या काळात ब्रिटनमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने धुमाकूळ घातला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना करून भारत या साथीच्या प्रभावातून मुक्त होण्याच्या स्थितीत होता. भारतीय अर्थव्यवस्थाही भरारी घेण्याच्या तयारीत होती. नेमक्या अशाच काळात कोरोनाची दुसरी लाट भारतात आली आणि परिस्थिती चिघळली, हे सारे अत्यंत संशयास्पद आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या फैलावणार्‍या विषाणूंप्रमाणे कोरोना फैलावत नाही, असे सांगून भारतीय विश्‍लेषक यासाठी चीन जबाबदार असल्याचे आत्मविश्‍वासाने सांगू लागले आहेत.

leave a reply