कोरोनाच्या जागतिक क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

नवी दिल्ली – देशात चोवीस तासात सुमारे २३ हजार रुग्ण आढळल्याने रविवार सकाळपर्यंत देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ६ लाख ७३ हजारांवर पोहोचली होती. तर रात्रीपर्यंत देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या वाढून ६ लाख ९५ हजारांवर गेली. कोरोनाच्या रुग्ण संख्येच्या बाबतीत भारत आता जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच देशातील कोरोनाच्या बळींची संख्या १९ हजारांच्या पुढे गेली आहे.

तिसऱ्या स्थानावर

देशात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत शनिवारी मोठी वाढ झाली होती. चोवीस तासात सुमारे २३ हजार नवे रुग्ण आढळले. तर रविवारी रात्रीपर्यंत २१ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाल्याने देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या ६ लाख ९५ हजारांवर पोहोचली. कोरोनाच्या रुग्ण संख्या भारतात रशियाहून अधिक झाली आहे. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये भारतापेक्षा रुग्ण अधिक आहेत. मात्र भारतात रुग्ण बरा होण्याचा दर या देशांपेक्षा जास्त असून मृत्यूदर कमी आहे. गेल्या चोवीस तासातच १४,८५६ रुग्ण बरे झाले आहेत.

महाराष्ट्रात दिवसभरात १५२ जण दगावले आणि ६५५५ नवे रुग्ण आढळले. दिल्लीत २५०५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तामिळनाडूत ६० जण दगावले असून ४१५० नव्या रुग्ण आढळले. कर्नाटकातही दीड हजराहून अधिक रुग्णांची नोंद झाली. उत्तरप्रदेशात दिवसभरात १२०० नवे रुग्ण सापडले आहेत. गुजरातमध्ये ७२५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, केरळ सरकारने जुलै २०२१ सालापर्यंत कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठीची नियमावली जारी केली आहे. मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले असून थुंकण्यास मनाई आहे. तसेच नियम मोडणाऱ्यास १० हजार दंड आणि दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे केरळ सरकारने स्पष्ट केले आहे.

leave a reply