लडाखमधून भारताने सैन्य मागे घ्यावे

- चीनचे आवाहन

नवी दिल्ली – भारतीय सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आपल्या बेकायदेशीर कारवाया त्वरीत थांबवून माघार घ्यावी, अशी मागणी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. मात्र भारतीय लष्कराने चीनच्या हद्दीत घुसखोरी केल्याचे आरोप धुडकावून लावले आहेत. त्याचवेळी सध्या भारताच्या नियंत्रणात असलेल्या भूभागाचा ताबा घेण्याचा प्रयत्न चीनने केला तर, त्याला प्रत्युत्तर मिळेल, असे स्पष्ट संकेत भारतीय लष्कराने चीनला दिले आहेत. पँगाँग त्सो सरोवरच्या दक्षिणेकडे असलेल्या काला टॉप व इतर टेकड्यांवर ताबा मिळविण्यासाठी चीनचे लष्कर धडपडत आहे. त्या पार्श्वभूमीवर, याबाबत भारताकडून देण्यात आलेले हे इशारे महत्त्वाचे ठरतात.

सैन्य

२९-३० ऑगस्टच्या रात्री काला टॉपचा पहाडी इलाका ताब्यात घेऊ पाहणार्‍या चिनी जवानांना भारतीय सैनिकांनी चांगलाच हिसका दाखविला होता. यामुळे माघार घेणार्‍या चिनी जवानांनी आणखी दोन वेळा हा पहाडी इलाका ताब्यात घेण्याचे प्रयत्न करुन पाहिले. मात्र सतर्क भारतीय सैनिकांनी चीनचा हा डाव उधळून लावला. यामुळे राजनैतिक पातळीवर इशारे व युद्धाच्या धमक्या देण्याच्या व्यतिरिक्त चीन काही करू शकत नसल्याचे दिसत आहे.

सैन्यभारतीय सैनिकांनी चिनी लष्करावर केलेल्या या कारवाईची अमेरिकेनेही दखल घेतली आहे. लडाखमध्ये चीन भारताच्या हद्दीत घुसखोरी करीत असल्याचे सांगून अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने चीनच्या या चिथावणीखोर कारवायांवर टीका केली आहे. इथे घुसखोरी करुन चीनने आपल्याच पायावर धोंडा मारुन घेतला, असा शेरा अमेरिकी गुप्तचर विभागाने मारला आहे. पाश्चिमात्य वर्तमानपत्रांनीही काला टॉप येथे भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईच्या बातम्यांना प्रसिद्धी दिली. भारतीय सैनिकांनी चीनला मोठा धक्का दिल्याची बाब यामध्ये नमूद करण्यात आली होती.

भारतीय लष्कराची कारवाई आणि जगभरात त्याला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे चीन कमालीचा बेचैन झाल्याचे दिसत आहे. भारतीय सैन्य आता लडाखच्या या क्षेत्रात मोक्याच्या ठिकाणी तैनात असून इथून भारतीय सैन्याच्या विरोधात कारवाई करणे चीनला शक्य होणार नाही. यासाठी थेट संघर्ष पुकारण्याची धमक चीनकडे नसल्याचा निर्वाळा सामरिक विश्लेषक देत आहेत. त्यामुळे राजनैतिक पातळीवर हा मुद्दा उपस्थित करुन भारताला माघार घेण्यासाठी आवाहन चीन करीत आहे. एकेकाळी चीनच्या घुसखोरीवर भारताकडून अशा प्रकारचे आवाहन चीनला केले जात होते. मात्र चीनने भारताचे औदार्य गृहित धरण्याची चूक करुन लडाखच्या सीमाभागात घुसखोरी केली आणि आत्ता त्याला मुखभंग करणारे प्रतुत्तर मिळत आहे, हे सत्य स्वीकारणे चीनला जड जात आहे. भारतीय सामरिक विश्लेषक वारंवार ही बाब लक्षात आणून देत आहेत. तसेच यापुढे भारताने चीनवर विश्वास ठेवण्याची चूक करु नये, असा सल्लाही देत आहेत.

leave a reply