चीनच्या सीमेवरील तणावाची भारताकडून गंभीर दखल

- पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्याची सेनादल प्रमुखांशी उच्चस्तरीय चर्चा

नवी दिल्ली – लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैनिक एकेमकांसमोर खडे ठाकलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित डोवाल, संरक्षणदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याबरोबर तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखांशी चर्चा केली. याआधी सेनाप्रमुखांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याबरोबरही चर्चा केली होती. या बैठकींचे तपशील जाहीर करण्यात आलेले नाहीत. मात्र भारत आपल्या सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड करणार नाही. सीमेवर शांततेसाठी चीनबरोबर चर्चा सुरु राहील, पण या भागात सुरु असलेले रस्त्याचे काम कोणत्याही परिस्थिती थांबविले जाणार नाही व चीनच्या प्रमाणात सीमेवर सैनिकांची तैनाती केली जाईल, असे निर्णय या बैठकीत झाल्याचे बोलले जाते.

लडाखमध्ये पँगोंग सरोवर क्षेत्रात एका ठिकाणी आणि गलवान खोऱ्यात तीन ठिकाणी भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर खडे ठाकले आहेत. यामध्ये गलवान फिंगर पॉईंट क्षेत्रात तणाव खूपच वाढला आहे. या भागात चिनी जवानांनी घुसखोरी करून तंबू ठोकले आहेत, तसेच खंदक खणण्याचे कामही चीनकडून सुरु आहे. यासाठी येथे आवश्यक साहित्यही आणण्यात आले आहे. या भागात टेहळणीसाठी चीनने हेलिकॉप्टर्स ड्रोन तैनात केल्याच्या बातम्या येत आहेत.

भारतीय सैनिकही चीनचा हा घुसखोरीचा डाव हाणून पाडण्यासाठी येथे खडे ठाकले आहेत. भारतीय सैनिकांनी गलवान नदी क्षेत्रात चिनी जवानांच्या समोरच आपले तंबू ठोकले आहेत. गलवान क्षेत्रात चीनने तैनाती वाढवल्यानंतर येथे भारतीय सैनिकांची तैनातीही वाढविण्यात आली आहे. काही अहवालानुसार चीनने लडाखला लागून असलेल्या सीमेनजीक पाच हजार अतिरिक्त सैनिक तैनात केले आहेत, तर काही बातम्यांमध्ये चीनने १० हजार सैनिक तैनात केल्याचा दावा करण्यात येत आहेत.

मंगळवारी चीनच्या सरकारचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’मधून संपूर्ण गलवान खोरे चीनचा भाग असल्याचा दावा करण्यात आला. तसेच भारत हेतुपुरस्कर वाद निर्माण करीत आहे आणि गलवान खोऱ्यात चीनच्या भागात संरक्षणविषयक सुविधा उभारत आहे, असा आरोप या दैनिकाने केला आहे. यामुळे चीनला उत्तर देण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही, असा दावाही चीनच्या या मुखपत्राने केला आहे. गलवान खोऱ्यावरून सुरु झालेला हा वाद भारताचा सुनियोजित कट असून मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय सैनिकांनी या भागात घुसखोरी सुरु केली, असा ठपकाही ‘ग्लोबल टाईम्स’ने ठेवला आहे.

१९६२ सालच्या युद्धाची आठवणही ‘ग्लोबल टाईम्स’मधील या लेखात करून देण्यात आली आहे. १९६२ साली दोन्ही देशांची ताकद एकसारखी होती. पण आता चीनचा जीडीपी भारताच्या पाच पट आहे. भारत सरकार, भारतीय लष्कर, तेथील बुद्धीजीवी आणि माध्यमे चीनच्या बाबतीतील आपली समज वाढवितील, असा शेरा ‘ग्लोबल टाईम्स’मधील या लेखात मारण्यात आला आहे. एकप्रकारे चीनने भारताला युद्धाची धमकी दिली आहे. याआधीही ग्लोबल टाईम्समधून भारतानेच घुसखोरी केल्याचे असे दावे करण्यात आले होते.

भारत आणि चीनमध्ये कुठल्यावर पातळीवर तणाव निर्माण झाला की ग्लोबल टाईम्स व चीनच्या कम्युनिस्ट राजवटीची इतर मुखपत्रे भारताला १९६२ च्या युद्धाची आठवण करून देतात. २०१७ साली डोकलाममध्ये भारत व चीनचे सैनिक एकमेकांसमोर खडे ठाकले असतानाही चीनची माध्यमे आणि नेते देखील भारताला ६२ पेक्षा अधिक मानहानीकारक पराभव पत्करावा लागेल असे धमक्या देत होते. मात्र त्याचा भारतीय लष्कराच्या मनोधैर्यावर काडीचाही परिणाम झाला नव्हता. अखेरीस भारताच्या निर्धारासमोर चीनला झुकावे लागले होते. अशीच परिस्थिती गलवान नदी क्षेत्रात पुन्हा निर्माण झाली असून यावेळीही भारत चीनला सडेतोड प्रत्युत्तर देत असल्याचे दिसत आहे.

सीमेवर परिस्थिती निवळावी यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्कराबरोबर सहा वेळा चर्चा झाली. मात्र यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. चीनने भारताला येथे सुरु असलेले पायाभूत सुविधांच्या विकास कामे थांबविण्याची आणि यथास्थिती कायम ठेवण्याची अट घातली आहे. मात्र भारताने चीनची मागणी धुडकावली आहे.

या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, वायुसेनाप्रमुख एअर मार्शल राकेश कुमार सिंग भदोरिया आणि नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांच्याबरोबर चर्चा केली. लडाख सीमेवरील परिस्थितीचा आणि सज्जतेचा आढावा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी घेतला. चारच दिवसांपूर्वी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी लडाखला भेट देऊन येथे पाहणी केली होती. या बैठकीनंतर काही तासातच सर्व सेनाप्रमुखांनी पंतप्रधानांनी एनएसए अजित डोवाल यांच्या उपस्थितीत सर्व सेनाप्रमुखांशी चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्याबरोबरही स्वतंत्र बैठक केली. तसेच बुधवारपासून लष्कराची कमांडो कॉन्फरन्सही सुरु होत आहे.

लडाखमध्ये सीमेनजीक भारताकडून सुरु असलेला पायभूत सुविधांचा विकास चीनला खपलेला नाही. यामुळे येथे भारताची संरक्षणविषयक क्षमता वाढेल, याची चीनला भीती वाटत आहे. तसेच कोरोनाव्हायरसच्या संकटानंतर चीनमधील बहुराष्ट्रीय कंपन्या पर्याय म्हणून भारताची निवड करीत आहेत, हे सुद्धा चीनच्या अस्वस्थेमागील प्रमुख कारण मानले जाते. यामुळे चीन तणाव वाढवून भारतावर दबाव टाकत आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. इतकेच नाही तैवान आणि हाँगकाँगप्रश्नी भारताने आपल्या विरोधात भूमिका घेऊ नये यासाठीही चीन हे दडपण टाकत असल्याचे काही निरीक्षकांचे म्हणणे आहे. ‘पीओके’वर भारत कारवाई करील या भीतीपोटी चीन सीमेवरील तणाव वाढवत असल्याचा दावा काही भारतीय विश्लेषकांनी केला आहे.

leave a reply