अंतराळ युद्धाचा धोका लक्षात घेऊन भारताला अंतराळ क्षेत्रात आक्रमक आणि बचावात्मक क्षमता विकसित करावी लागेल

- संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी बजावले

नवी दिल्ली – अंतराळात लष्करीकरणाची स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे अंतराळ युद्धाची शक्यता वाढली असून भारताला वर्तमान आणि भविष्यातील आव्हानांचा विचार करून यासाठी तयार रहायला हवे. भारताला अंतराळ क्षेत्रात आक्रमक आणि बचावात्मक अशा दोन्ही क्षमता विकसित कराव्या लागतील, असे संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी बजावले आहे.

अंतराळ युद्धाचा धोका लक्षात घेऊन भारताला अंतराळ क्षेत्रात आक्रमक आणि बचावात्मक क्षमता विकसित करावी लागेल - संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी बजावलेइंडियन स्पेस असोसिएशनतर्फे ‘इंडियन डेफस्पेस सिम्पोजियम’ या परिसंवादाचे आयोजन केले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन संरक्षणदलप्रमुख जनरल चौहान यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना अंतराळ क्षेत्रात वाढत असलेली तीव्र स्पर्धा व भारताच्या चिंता जनरल चौहान यांनी अधोरेखित केल्या.

अंतराळ क्षेत्र जमीन, समुद्र, हवाई तसेच सायबर क्षेत्राची क्षमताही वाढविते. अंतराळाचा लष्करी वापर हा जोरदार प्रभाव टाकणारा आहे आणि त्यापासून आपण अलिप्त राहू शकत नाही’, असा इशारा जनरल चौहान यांनी दिला. रशिया आणि चीनसारख्या देशांनी उपग्रहभेदी चाचण्या घेतल्या आहेत, याकडे लक्ष वेधताना भारताला या क्षेत्रात आपल्या क्षमता वाढवाव्या लागणार असल्याचे जनरल चौहान यांनी स्पष्ट केले. भारताने अंतराळ क्षेत्रात आक्रमक आणि बचावात्मक अशा दोन्ही क्षमता विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी बजावले.

वर्तमान आणि भविष्याचा विचार करून भारताने आता अंतराळ क्षेत्रात आपल्या क्षमता विकसित करायला हव्यात. यासाठी दुहेरी वापर करता येईल अशा अतिप्रगत तंत्रज्ञानावर भर द्यायला हवा. देशाच्या ‘नाविक’ या उपग्रह साखळीचा व त्याचा क्षमतांचा विस्तार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तसेच जलदरित्या गोपनीय माहिती मिळविणे, टेहळणी करणे, लष्करी सर्वेक्षण यासाठी उपग्रह आधारीत यंत्रणांचा वापर वाढायला हवा. याशिवाय उपग्रहाच्या सहाय्याने दूरसंचार सेवेची सुरक्षा निश्चित करण्याची गरज असल्याचे संरक्षणदलप्रमुख जनरल चौहान यांनी अधोरेखित केले.

युक्रेन युद्धात स्पेसएक्स आणि मॅक्सर या खाजगी व्यावसायिक अंतराळ कंपन्यांचा वापर होत आहे. त्यामुळे या युद्धाने नवे क्षेत्र जगासमोर आले आहे, याकडे जनरल चौहान यांनी लक्ष वेधले. अंतराळ क्षेत्रात स्पर्धा जशी तीव्र होत चालली आहे, तसतसे या क्षेत्राचे वेगाने लष्करीकरण होत आहे. त्यामुळे अंतराळ क्षेत्र आता युद्धभूमी बनले असून त्याचा विस्तार होत आहे. युद्धाचे स्वरुप यामुळे बदलत असल्याचे जनरल चौहान म्हणाले.

तसेच अंतराळ क्षेत्रात होत असलेली गर्दी ही अंतराळातील पर्यावरणासाठीही आणि अंतराळातील मालमत्तेसाठी धोकादायक आहे. भारतानेही याबाबत आता जागरुक होण्याची आवश्यकता आहे. इस्रोचे प्रोजेक्ट नेत्र या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे, अशी प्रशंसा जनरल चौहान यांनी केली. प्रोजेक्ट नेत्र हे अंतराळतील कचरा व इतर धोक्यांपासून देशाच्या उपग्रह व इतर साधनसंपत्तीला सुरक्षित ठेवण्यासाठी उभारण्यात आलेली अर्ली वॉर्निंग सिस्टिम आहे.

leave a reply