भारत अमेरिकेत इंधन साठविण्याच्या विचारात – पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधन तेलाच्या किंमती विक्रमी घसरलेल्या आहेत. याचा लाभ घेऊन भारताने इंधनाची साठवणूक करणाऱ्या रिफायनरीज् पूर्ण भरून घेतल्या होत्या. आता भारत अमेरिकेमध्ये इंधन तेल साठविण्याचा विचार करीत आहे, याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. माध्यमांशी बोलताना पेट्रोलियम मंत्र्यांनी सरकारच्या विचाराधीन असलेल्या या प्रस्तावाची माहिती दिली.

भारत मागणीच्या ८० टक्के इंधन आयात करतो. त्यासाठी भारताचे अब्जावधी डॉर्लस खर्च होतात. म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनतेलाच्या किंमती घसलल्यानंतर, भारताने इंधनतेलाचा साठा केला. देशाने जवळपास तीन कोटी २० लाख टन इंधन साठवणूक टाक्या, पाईपलाईन आणि जहाजांमध्ये साठवून ठेवले आहे. आता ही क्षमता पूर्ण झाल्यावर भारत अमेरिकेत इंधन तेल साठवणूक करण्याच्या विचारात आहे, असे धर्मेंद्र प्रधान म्हणाले. मध्यंतरी ऑस्ट्रेलिया अमेरिकेत इंधन साठविण्याचा विचार करीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या धर्तीवर भारतही अमेरिकेत इंधनाची साठवणूक करण्याचा विचार करीत असल्याचे प्रधान यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाच्या किंमती घसरल्यानंतर, २०१९-२० या वित्तीय वर्षात देशाच्या इंधन आयातीच्या बिलात ९ टक्क्यांची कपात झाल्याची बातमी आली होती. मात्र लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर हळूहळू देशातील इंधनाची मागणी पूर्वपदावर येईल, असे नुकतेच पेट्रोलियम मंत्र्यांनी म्हटले होते.

leave a reply