आंतरराष्ट्रीय पातळीवरील आव्हानात्मक परिस्थितीतही भारताचा इतर देशांबरोबरील व्यापार 1.6 ट्रिलियन डॉलर्सवर

- ‘जीटीआरआय’चा अहवाल

नवी दिल्ली – सारे जग आर्थिक मंदीच्या छायेत असताना, 2023च्या मार्च महिन्यात संपलेल्या वित्तीय वर्षात भारताचा इतर देशांबरोबरील व्यापार 1.6 ट्रिलियन डॉलर्सवर गेल्याचे दिसत आहे. ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटीव्ह’ने (जीटीआरआय) हा अंदाज वर्तविला. भारताच्या जीडीपीच्या तुलनेत इतर देशांबरोबरील एकूण व्यापाराचे प्रमाण 48 टक्के इतके असल्याची बाब ‘जीटीआरआय’ने लक्षात आणून दिली. ही अत्यंत सकारात्मक बाब असल्याचे सांगून यामुळे जागतिक व्यापारातील भारताचा वाढता हिस्सा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अतिशय उपकारक ठरेल, असे ‘जीटीआरआय’ने नमूद केले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील आव्हानात्मक परिस्थितीतही भारताचा इतर देशांबरोबरील व्यापार 1.6 ट्रिलियन डॉलर्सवर - ‘जीटीआरआय’चा अहवालदोन दिवसांपूर्वी व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी 2022-23च्या वित्तीय वर्षात देशाची निर्यात तब्बल 750 डॉलर्सहून अधिक असेल, असे जाहीर केले होते. ताज्या आकडेवारीनुसार ही निर्यात तब्बल 755 अब्ज डॉलर्सवर गेल्याचे उघड झाले आहे. तर पुढच्या सात वर्षात, 2030 सालात आपली निर्यात दोन ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याचे ध्येय भारताने समोर ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘जीटीआरआय’ने मार्च 2023 रोजी संपलेल्या वित्तीय वर्षात भारताचा इतर देशांबरोबरील व्यापार 1.6 ट्रिलियन डॉलर्सवर गेल्याचे जाहीर केले.

भारतीय अर्थव्यवस्था मार्च 2023पर्यंत 3.4 ट्रिलियन डॉलर्सवर गेली होती. त्यामुळे भारताचा 1.6 ट्रिलियन डॉलर्सचा इतर देशांबरोबरील व्यापार आपल्या जीडीपीच्या 48 टक्के इतका असल्याचे समोर येत आहे. जीडीपीच्या तुलनेत व्यापाराचे वाढते प्रमाण देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अतिशय उपकारक बाब मानली जाते. देशाची अर्थव्यवस्था जागतिक व्यापाराशी अधिक चांगल्यारितीने जोडली जात आहे, असा त्याचा अर्थ होतो, असे सांगून ‘जीटीआरआय’च्या अहवालात यावर समाधान व्यक्त करण्यात आहे.

इतर देशांबरोबरील भारताच्या व्यापारात सेवा क्षेत्राने उत्तम कामगिरी बजावली आहे. तसेच अमेरिका, युएई, नेदरलँड, चीन, बांगलादेश, सिंगापूर, ब्रिटन व जर्मनी या देशांना भारताकडून अधिक प्रमाणात निर्यात केली जाते, असे ‘जीटीआरआय’ने म्हटले आहे. त्याचवेळी भारतात दळणवळणाच्या सुविधांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून बंदरांच्या विकासामुळे व्यापार अधिक सुलभ झाल्याचा दावाही ‘जीटीआरआय’ने केला आहे. याचा लाभ भारताच्या इतर देशांबरोबरील व्यापाराला मिळत आहे, असे सांगून या आघाडीवर देशाने केलेल्या प्रगतीची नोंद ‘जीटीआरआय’ने केली. मुख्य म्हणजे कोरोनाची साथ व त्यानंतर भडकलेले युक्रेनचे युद्ध, या आव्हानांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आव्हानात्मक स्थिती असताना देखील भारताला आपला इतर देशांबरोबरील व्यापार वाढविण्यात मिळालेले हे यश लक्षणीय ठरते.

त्यातही भारताच्या निर्यातीत झालेली वाढ आश्वासक असून पुढच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था अधिक दमदार कामगिरी करून दाखविल, असे संकेत देत असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. जीटीआरआयचा अहवाल याला दुजोरा देत असल्याचे दिसते.

leave a reply