भारत आणि अमेरिकेला चीनपासून एकसारखाच धोका संभवतो

- अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडप्रमुखांचा दावा

वॉशिंग्टन – भारत आणि अमेरिकाला चीनकडून एकसमान धोका असल्याचा दावा अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडचे प्रमुख ॲडमिरल जॉन ॲक्विलिनो यांनी म्हटले आहे. म्हणूनच भारताबरोबरील आपल्या भागीदारीला अमेरिका विशेष महत्त्व देत आहे आणि ही भागीदारी अधिकाधिक विकसित करण्यासाठी आम्ही अहोरात्र काम करीत आहोत, असा दावा ॲडमिरल ॲक्विलिनो यांनी केला. त्यांचे हे दावे प्रसिद्ध होत असतानाच, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी आपला देश भारताबरोबर आर्थिक विकास करण्यासाठी व द्विपक्षीय सहकार्य व्यापक करण्यासाठी बांधिल असल्याचे म्हटले आहे.

भारत आणि अमेरिकेला चीनपासून एकसारखाच धोका संभवतो - अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडप्रमुखांचा दावाअमेरिकेच्या अर्थमंत्री जनेट येलेन यांनी आपल्या देशाला चीनशी उत्तम संबंध अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. गुरुवारीच जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील आपल्या भाषणात अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी चीनबरोबरील संबंधांना महत्त्व दिले. बायडेन प्रशासन देखील शक्य त्या मार्गाने चीनला व्यापारी तसेच इतर सवलती देण्यासाठी धडपडत असल्याचे आरोप केले जातात. स्वतः राष्ट्राध्यक्ष बायडेन व त्यांचा मुलगा हंटर बायडेन यांनी चीनकडून लाच घेतल्याची जहरी टीका विरोधी पक्षनेते तसेच काही पत्रकार करीत आहेत. मात्र बायडेन प्रशासनाच्या चीनविषयक भूमिकेवर अशारितीने प्रश्न उपस्थित केले जात असतानाच, अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडने सातत्याने भारताबरोबरील सहकार्याला सर्वाधिक महत्त्व असल्याचे वारंवार स्पष्ट केले होते.

अमेरिकेचे जबाबदार नेते, आजी व माजी लष्करी अधिकारी, मुत्सद्दी सातत्याने चीनचा धोका अधोरेखित करून अमेरिकेच्या भारताबरोबरील संबंधांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. ॲडमिरल ॲक्विलिनो यांनी देखील भारत व अमेरिकेला इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनकडून एकसमान सुरक्षाविषयक आव्हाने संभवतात, याची जाणीव करून दिली. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत व अमेरिकेचा समान मुल्यांवर विश्वास आहे. भारत व अमेरिकन नागरिकांचा एकमेकांशी उत्तम संवाद व सहकार्य आहे, क्वाडच्या सदस्य देशांशी भारत व अमेरिका समन्वय राखून आहेत, असे ॲडमिरल ॲक्विलिनो म्हणाले.

तर व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जीन -पेरी यांनी देखील क्वाडच्या माध्यमातून भारत व अमेरिका सहकार्य करीत असल्याचा दावा केला. दोन्ही देशांच्या आर्थिक प्रगती व विकासासाठी तसेच सहकार्य वाढविण्यासाठी अमेरिका वचनबद्ध असल्याचा दावा जीन-पेरी यांनी केला. चीनला मागे टाकून अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर, व्हाईट हाऊसमधून केली जाणारी ही विधाने लक्षणीय ठरतात. या बायडेन प्रशासनाने याआधीही अशा स्वरुपाची विधाने करून भारताला खूश केले असले, तरी चीनविरोधी आघाडीबाबत बायडेन प्रशासन तितकेसे गंभीर नसल्याची बाब अनेकवार स्पष्ट झाली होती.

leave a reply