2023 सालच्या मंदीचा भारताला लाभ मिळेल

डब्ल्यूईएफच्या अहवालाचा निष्कर्ष

डॅव्होस – 2023 सालात जगाला मंदीचा सामना करावा लागेल, असे इशारे जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळत आहेत. ठराविक अंतराने मिळत असलेल्या या जागतिक मंदीच्या इशाऱ्यात नवी भर पडली आहे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम-डब्ल्यूईएफ’च्या अहवालात देखील या वर्षी जागतिक मंदी येईल, असे बजावण्यात आले आहे. इतकेच नाही तर अन्नधान्याची टंचाई, ऊर्जा पुरवठ्यासमोरील संकट आणि महागाई, अशी तीन आव्हाने जगाला भेडसावणार असल्याचे डब्ल्यूईएफच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र या आघाडीवरील पुरवठा साखळीच्या वैविध्याचा लाभ भारत आणि बांगलादेशाला मिळेल. म्हणूनच भारताला या आर्थिक मंदीचा फायदा मिळू शकतो, असा निष्कर्ष या अहवालात नोंदविण्यात आला आहे.

World_Economic_Forum_logoआर्थिक मंदीचे संकट समोर खडे ठाकले आहे, याची जाणीव एव्हाना जगभरातील सर्वच प्रमुख देश व बहुराष्ट्रीय कंपन्यांना झालेली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी खर्चात कपात करण्याचे धोरण उद्योगक्षेत्राने स्वीकारलेले आहे. तर प्रमुख देश देखील मंदी येणार हे लक्षात घेऊन पावले उचलत असल्याचे दिसते आहे. त्यातच जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी मंदी अटळ असल्याचे सांगण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘डब्ल्यूईएफ’च्या अहवालातील निष्कर्षाने लक्ष वेधून घेतले आहे. अन्नधान्याची टंचाई, ऊर्जेचे संकट आणि महागाई अशा तीन आघाड्यांवरील आव्हानांना एकाच वेळी तोंड द्यावे लागेल व त्याचे विपरित परिणाम देशांवर होतील, असा इशारा या अहवालाने दिला आहे.

डब्ल्यूईएफच्या बहुसंख्य अर्थतज्ज्ञांना आर्थिक मंदी आल्यावाचून राहणार नाही, असे वाटत आहे. सध्या जगभरात सुरू असलेला भू-राजकीय तणाव पुढच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेला आकार देईल आणि त्यामुळे अमेरिका व युरोपिय देश बचावात्मक वित्तीय धोरणे स्वीकारतील. यामुळे पुढच्या काळात आर्थिक विकासाचा दर खाली येईल, असा दावा सदर अहवालात करण्यात आला आहे. डब्ल्यूईएफच्या अर्थतज्ज्ञांमध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेच्या भवितव्याबाबत तीव्र मतभेद आहेत. काही अर्थतज्ज्ञांना चीनची अर्थव्यवस्था अधिकाधिक कमकुवत बनेल, असे वाटत आहे. तर काहीजण चीनची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा भरारी घेईल, असे दावे करीत आहेत.

तसेच महागाईचे प्रमाण देखील वेगवेगळ्या ठिकाणी निरनिराळे असेल, याकडे सदर अहवालात लक्ष वेधण्यात आले. युरोपिय देशांमध्ये महागाईचा दर 57 टक्क्यांपर्यंत जाईल, तर चीनमध्ये महागाई केवळ पाच टक्के इतकाच प्रभाव टाकू शकेल, असे हा अहवाल सांगतो. मात्र जागतिक पातळीवर ही आव्हाने समोर येत असताना, भारत आणि बांगलादेशावर आर्थिक मंदीचा परिणाम होणार नाही, असा दावा या अहवालाने केला आहे. आंतरराष्ट्रीय उद्योगक्षेत्र मोठ्या प्रमाणात चीनमधील पुरवठा साखळीवर अवलंबून असताना, भारत व बांगलादेशाने पुरवठा साखळीत वैविध्य आणून या संकटापासून आपला बचाव केलेला आहे. म्हणूनच भारताला या आर्थिक मंदीचा लाभ मिळू शकेल, असे डब्ल्यूईएफचा अहवाल सांगत आहे.

leave a reply