भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्त्व करील

-पंतप्रधान नरेंद्र मोदी

म्युनिक – भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्त्व करील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. जर्मनीच्या म्युनिकमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधानांनी हा विश्वास व्यक्त केला. गेल्या काही वर्षात भारताने विविध क्षेत्रात झपाट्याने केलेल्या प्रगतीचा दाखला देऊन पंतप्रधानांनी ही घोषणा केली. यावेळी उपस्थित असलेल्या जर्मनीतील भारतीय समुदायाने पंतप्रधानांच्या या दाव्याला जबरदस्त प्रतिसाद दिला.

Narendra-modiभारत ही लोकशाहीची जननी आहे. सारे भारतीय जगभरात ही बाब मोठ्या अभिमानाने सांगू लागले आहेत. भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृती, अन्नसंस्कृती, वस्त्रप्रावर्णे, संगीत व परंपरा या साऱ्या गोष्टी देशाची लोकशाही अधिकच भक्कम करणाऱ्या ठरतात. लोकशाही उत्तम परिणाम देऊ शकते, हे भारताने साऱ्या जगाला दाखवून दिले आहे, असे पंतप्रधानांनी म्युनिकमधील आपल्या भाषणात ठासून सांगितले. त्याचवेळी आधुनिक भारताने केलेल्या प्रगतीचा पाढाच यावेळी पंतप्रधानांनी वाचला. जगभरात तितके डिजिटल व्यवहार होत आहेत, त्याच्ा 40 टक्के इतक्या प्रमाणात डिजिटल व्यवहार एकट्या भारतात होतात, अशी स्तिमित करणारी माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.

नवा भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्त्व करणाऱ्यांपैकी एक असेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. भारतीय मोठ्या वेगाने 21 व्या शतकातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करीत आहे. आपली स्वप्ने साकार करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. तंत्रज्ञान व डिजिटल क्रांतीचा साक्षीदार असून लसीकरणापासून ते कृषी क्षेत्रात ड्रोन्सच्या वापरापर्यंत भारत संशोधनावर आधारलेल्या भविष्याकडे समर्थपणे वाटचाल करीत आहे. जगासमोर खड्य ठाकलेल्या समस्या सोडविण्यासाठी भारत किफायतशीर पर्याय समोर घेऊन येत आहे. ‘इंटरनॅशनल सोलर अलायन्स’द्वारे भारताने जगाला एकच सूर्य, एकच जग, एकच ग्रीडचा संदेश दिला, याचा गौरवपूर्ण उल्लेख यावेळी पंतप्रधानांनी केला.

एकेकाळी भारत स्टार्टअप्सच्या शर्यतीत कुठेही नव्हता. पण आज स्टार्टअप्सच्या क्षेत्रातील भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. साधे फोन देखील आयात करणारा भारत आज स्मार्टफोन्सच्या उत्पादनाच्या आघाडीवर दुसऱ्या क्रमांकाचा देश झाला आहे. कोरोनाची साथ रोखण्यासाठी भारताने लसीकरणाची मोहीम राबविली. भारतातील लसीकरणाची मोहीम पूर्ण होऊन साऱ्या जनतेला कोरोनाची लस मिळण्यासाठी 10 ते 15 वर्षांचा कालावधी लागेल, असे दावे काहीजणांनी ठोकले होते. पण आजच्या घडीला भारताच्या 90 टक्के इतक्या जनतेने कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत. भारताच्या लसीकरण मोहीमेच्या या वेगाने सारे जग थक्क झाले आहे. इतकेच नाही तर भारताने पुरविलेल्या कोरोनाच्या लसीमुळे जगभरातील कोट्यवधीजणांचा जीव वाचला, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

leave a reply