युरोपिय महासंघाबरोबर मुक्त व्यापारी करार करताना भारत आपल्या शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही

- व्यापारमंत्री पियूष गोयल

रोम – युरोपिय महासंघाशी मुक्त व्यापारी करार करीत असताना, भारत आपले शेतकरी आणि दुग्धोत्पादकांच्या हिताशी तडजोड करू शकत नाही, असे व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी बजावले आहे. फ्रान्सनंतर इटलीच्या दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री गोयल यांनी यासंदर्भातील भारताची भूमिका स्पष्ट केली. याआधी संयुक्त अरब अमिरात (युएई) व ऑस्ट्रेलियाबरोबर मुक्त व्यापारी करार करताना देखील भारताने आपल्या हितसंबंधांशी तडजोड केली नव्हती, याकडे पियूष गोयल यांनी लक्ष वेधले.

युरोपिय महासंघाबरोबर मुक्त व्यापारी करार करताना भारत आपल्या शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही - व्यापारमंत्री पियूष गोयल१७ जूनपासून भारत व युरोपिय महासंघामध्ये मुक्त व्यापारी करारावर वाटाघाटी सुरू होणार आहेत. सुमारे २७ युरोपिय देश सदस्य असलेल्या युरोपिय महासंघाबरोबर भारताचा मुक्त व्यापारी करार संपन्न झाला, तर त्याचे फार मोठे लाभ भारतीय अर्थव्यवस्थेला मिळतील. त्याचवेळी युरोपिय देशांना भारताची विस्तीर्ण बाजारपेठ उपलब्ध होईल. पण युरोपिय देशांच्या सर्वच मागण्या आपण पूर्ण करू शकत नाही, याची जाणीव याआधी भारताने करून दिली होती. विशेषतः आपले शेतकरी व दुग्धोत्पादन व्यवसायाशी निगडीत असलेल्यांचे हितसंबंध दुर्लक्षित करून हा करार होणार नाही, असे व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी पुन्हा एकदा बजावले आहे.

इटलीमध्ये बोलताना भारताच्या व्यापारमंत्र्यांनी युरोपिय महासंघाला हा इशारा दिल्याचे दिसते. युरोपिय महासंघाचे सदस्यदेश आणि भारतीयांच्या दरडोई उत्पन्नात फार मोठी तफावत आहे. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचे व डेअरी व्यवसायिकांचे हितसंबंध जपणे भारतासाठी आवश्यकच ठरते. या आघाडीवर तडजोड शक्य नाही, याची जाणीव गोयल यांनी करून दिली. त्याचवेळी भारतात युरोपिय महासंघाला फार मोठ्या व्यापारी संधी उपलब्ध आहेत, जगातील दुसरा कुठलाही देश अशा संधी देऊ शकत नाही, ही बाब देखील व्यापारमंत्र्यांनी यावेळी ठासून सांगितली.

२००७ साली भारत व युरोपिय महासंघामध्ये मुक्त व्यापारावर चर्चा सुरू झाली होती. मात्र भारताचे हितसंबंध लक्षात घेण्यास महासंघाने नकार दिल्यानंतर ही चर्चा खंडीत झाली. मात्र दशकभराचा कालावधी उलटल्यानंतर, भारत ही उदयाला येत असलेली फार मोठी आर्थिक शक्ती आहे, याची जाणीव युरोपिय महासंघाला झाली. विशेषतः कोरोनाची साथ आल्यानंतर भारताचे आर्थिक महत्त्व युरोपिय महासंघाच्या अधिक प्रकर्षाने लक्षात आले. त्यामुळे महासंघाने पुन्हा एकदा भारताबरोबर मुक्त व्यापारी करारासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र महासंघाच्या सर्वच मागण्या सरसकट मान्य करता येणार नाही, हे भारत स्पष्टपणे बजावत आहे. पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या व्यापारी चर्चेच्या आधी महासंघाला याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न भारताच्या व्यापारमंत्र्यांनी केला आहे.

फ्रान्स व इटली हे देश महासंघाबरोबरील भारताचा मुक्त व्यापारी करार लवकरात लवकर संपन्न व्हावा, यासाठी उत्सुक असल्याचा दावा देखील यावेळी पियूष गोयल यांनी केला.

leave a reply