भारत कुणालाही खूश करणारे निर्णय घेणार नाही

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

नवी दिल्ली – ‘युक्रेनचे युद्ध थांबवून चर्चा सुरू करण्यावर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले पाहिजे. यासाठी भारताने युक्रेन युद्धाबाबत स्वीकारलेली भूमिका सर्वोत्तम ठरते’, असे सांगून पुन्हा एकदा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारताने स्वीकारलेल्या तटस्थ भूमिकेचे समर्थन केले. त्याचवेळी युक्रेनच्या मुद्यावर भारताला उपदेश व इशारे देणाऱ्या अमेरिका व इतर पाश्चिमात्य देशांची पर्वा करणार नाही, हे देखील परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी रायसेना डायलॉगमध्ये स्पष्ट केले आहे. भारत कुणालाही खूश करणारे निर्णय घेणार नाही व जगाच्या मान्यतेसाठीही धडपडणार नाही, असे जयशंकर यांनी भारतावर टीका करणाऱ्यांना बजावले.

खूश करणारे निर्णयरायसेना डायलॉगमध्ये युक्रेनबाबत भारताने स्वीकारलेल्या भूमिकेवर पुन्हा पुन्हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. प्रत्येकवेळी परराष्ट्रमंत्र्यांनी याला समर्पक उत्तरे दिली. बुधवारीही जयशंकर यांनी युक्रेनचे युद्ध थांबवून चर्चा सुरू करण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करायला हवे, असे बजावले. भारत फार आधीपासून ही भूमिका मांडत असल्याची बाब जयशंकर यांनी लक्षात आणून दिली. मात्र अमेरिका व युरोपिय देश युक्रेनचे युद्ध संपविण्याच्या ऐवजी लांबविण्याच्या प्रयत्नात असल्याचे आरोप होत आहेत. त्याचा संदर्भ परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या विधानांद्वारे दिल्याचे दिसते. त्याचवेळी भारताला दुर्बलता दाखवून जगाची मान्यता मिळविण्याची काहीच गरज नाही. जे आपण नाहीत, ते दाखविण्याचा प्रयत्न भारताने करू नये. त्याऐवजी आपण जसे आहोत, तशाच पद्धतीने जगाशी वाटाघाटी करणे भारतासाठी श्रेयस्कर ठरेल. आता भारताला जगाला खूश करण्याची गरज राहिलेली नाही. तो काळ मागे पडलेला आहे, असे जयशंकर पुढे म्हणाले. भारतावर दडपण टाकण्याचे अमेरिका व इतर देशांचे प्रयत्न यशस्वी ठरणार नाहीत, असा संदेश याद्वारे जयशंकर यांनी दिला आहे.

त्याचवेळी पुढच्या 25 वर्षात भारत आपली जागतिक बांधिलकी व जबाबदाऱ्या तसेच भूमिका पार पाडून अधिक सखोलपणे ‘इंटरनॅशनल’ अर्थात आंतरराष्ट्रीय बनेल, असा विश्वास परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. पुढच्या काळात भारताने गर्वाच्या भूमिकेतून पाहण्याची गरज नाही. त्याऐवजी जगात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न भारताने करावा. त्यासाठी जगाला भारताच्या प्रगतीचे लाभ किती प्रमाणात मिळतील, ते जगासमोर मांडणे आवश्यक ठरेल, याचीही जाणीव परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी करून दिली.

याबरोबरच दक्षिण आशियाई क्षेत्रात एकेकाळी भारत हा एकमेव लोकशाहीवादी देश होता, ही बाब जयशंकर यांनी लक्षात आणून दिली. भारतामुळे दक्षिण आशियाई क्षेत्रात लोकशाहीचा विकास झाला. गेल्या 75 वर्षात भारताने जगाला काय दिले, या प्रश्नाचे उत्तर लोकशाही हे असल्याचे परराष्ट्रमंत्र्यांनी अभिमानाने सांगितले. दरम्यान, युक्रेनबाबत भारताने स्वीकारलेली भूमिका हा यावेळच्या रायसेना डायलॉगचा प्रमुख विषय ठरला. यावरून काही देशांच्या प्रतिनिधींनी भारताला घेरण्याचा व दबाव टाकण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण त्याला यश मिळालेले नाही. युक्रेनच्या मुद्यावरील भारताची भूमिका स्पष्ट तसेच व्यवहार्य आहे, हे बुधवारीही परराष्ट्रमंत्र्यांनी ठासून सांगितले आहे.

बायडेन प्रशासनाच्या भूमिकेमुळेच युक्रेनचे युद्ध पेटले आहे, अशी टीका अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींनी सुरू केली आहे. युक्रेनचा नाटोतील सहभाग ही आपली रेड लाईन असल्याचे रशियाने आधीच बजावले होते. तरीही बायडेन प्रशासनाने युक्रेनच्या नाटोतील सहभागावर हटवादी भूमिका घेतली, यावर अमेरिकन लोकप्रतिनिधींनी बोट ठेवले आहे. भारतानेही युक्रेनच्या मुद्यावर सर्वच देशांचे सार्वभौमत्त्व आणि सुरक्षिततेचे मुद्दे लक्षात घेणे गरजेचे असल्याचे सांगून अस्पष्टपणे का होईना, रशियाच्या भूमिकेचे समर्थन केले होते.

leave a reply