भारत लवकरच जागतिक उत्पादनाचे ऊर्जाकेंद्र बनेल

- भारताच्या पंतप्रधानांची ग्वाही 

नवी दिल्ली – मोठ्या मागणीबरोबर भारतात भक्कम लोकशाही आणि विविधता आहे. त्याचबरोबर भारतात स्थैर्यही आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारतातील गुंतवणुकीचे महत्व अधोरेखित केले. तसेच भारत लवकरच जागतिक उत्पादनाचे ऊर्जाकेंद्र बनेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. ‘व्हर्च्युअल ग्लोबल इन्व्हेस्टर राऊंडटेबल’ परिषदेत पंतप्रधान मोदी जगातील २० प्रमुख गुंतवणूकदारांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणुकीचे आवाहन केले.

‘कोरोना महामारीच्या संकटाचा भारताने ज्या पद्धतीने मुकाबला केला, तो साऱ्या जगाने पहिला. भारताचे राष्ट्रीय चारित्र्य आणि खरी ताकद सर्वाना दिसली. या संकट काळात भारताला ‘आत्मनिर्भर’ बनविण्याचा शोध ही सुनियोजित आर्थिक व्युहरचना आहे’, असे पंतप्रधान मोदी यांनी गुंतवणूकदारांना स्पष्ट केले. ‘चांगल्या  परताव्याबरोबर विश्वासहार्ता  हवी असेल, मागणी बरोबर लोकशाही हवी असले, तर भारतसारखा दुसरा कोणताही देश नसेल. इथे ‘स्टॅबिलिटी’ अर्थात स्थैर्य बरोबर ‘सस्टेनेबिलिटी’ अर्थात सातत्य मिळेल, याकडे पंतप्रधानांनी लक्ष्य वेधले. तसेच भारतातील विविधतेमुळे एकाच बाजारपेठेत कित्येक बाजार उपलब्ध आहेत, ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली.

भारताने गेल्या काही काळात आर्थिक सुधारणांसाठी मोठे निर्णय घेतले आहेत. यातून उद्योगांना दिलासा देण्यात आला आहे. भारताला जगातिक उत्पादन शक्ती बनविण्याचा संकल्प आहे. यासाठी सरकार भविष्यातही आवश्यक ती सर्व पावले उचलेल. भारत लवकरच जगातिक उत्पादनाचे ऊर्जाकेंद्र बनलेला असेल, असे पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले. एक मजबूत भारत जागतिक अर्थव्यवस्थेत स्थैर्यासाठी महत्वाचे योगदान देऊ शकतो,असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

दरम्यान, जगभरातील २० प्रमुख गुंतवणूकदार या ‘व्हर्च्युअल ग्लोबल इन्व्हेस्टर राऊंडटेबल’ परिषदेत सहभागी झाले होते. या प्रमुख गुंतवणूकदारांकडून जगातील ६ ट्रिलियन डॉलर्स इतक्या मालमत्तेचे व्यवस्थापन केले जाते. चीनमधून कित्येक कंपन्या आपली कारखाने इतरत्र हलवीत आहेत. भारताकडे या कंपन्या आणि गुंतवणूकदार अपेक्षेने पाहत असून भारत या गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी अशा परिषदांचे आयोजन केले जात आहे.

leave a reply