पाकिस्तानबरोबरील थेट युद्ध भारताने जिंकले, अप्रत्यक्ष युद्धही भारतच जिंकणार

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

नवी दिल्ली – ‘१९७१ सालच्या युद्धात भारताने पाकिस्तानला धूळ चारली. पाकिस्तानचा या युद्धात दारुण पराभव झाला होता. या युद्धाने दक्षिण आशियाचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला. पाकिस्तानबरोबरील थेट युद्धात भारताने विजय मिळवला, तसा या देशाने छेडलेल्या छुप्या युद्धातही भारताचा विजय निश्‍चित असल्याची मी ग्वाही देतो. दहशतवाद मुळापासून निखंदून टाकण्याच्या दिशेने काम सुरू झालेले आहे’, अशा शब्दात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला नवा इशारा दिला.

बांगलादेश मुक्ती संग्राम सुरू असताना, ३ डिसेंबर १९७१ रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये थेट युद्ध सुरू झाले आणि १६ डिसेंबरला बांगलादेशच्या स्वातंत्र्याने हे युद्ध संपले. अवघ्या १३ दिवसात पाकिस्तानने भारतीय सैन्यापुढे गुडघे टेकले. १९७१ सालच्या या युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळविलेला प्रचंड विजय आणि बांगलादेशच्या स्थापनेला ५० वर्ष पूण होत आहेत. यानिमित्ताने ‘स्वर्णिम विजय पर्व’ साजरे केले जात असून रविवारपासून इंडियापासून दिल्लीतील इंडिया गेटवर विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत.

या विजय पर्वाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी भारतीय सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे कृतज्ञतापूर्ण स्मरण केले. हे पर्व अत्यंत उत्साहात साजरे करण्याची इच्छा होती. मात्र हेलिकॉप्टर दुर्घटनेत संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी व ११ अधिकार्‍यांच्या मृत्यूनंतर हा कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘विजय पर्वा’चे उद्घाटन करताना आपल्याला जनरल रावत यांची आठवण येत असल्याचे राजनाथ सिंग म्हणाले.

पाकिस्तानने त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानच्या जनतेवर केलेल्या अत्याचाराचा उल्लेख राजनाथ सिंग यांनी केला. ‘आपल्या कला, संस्कृती आणि भाषा यांच्या संरक्षणाची मागणी करणार्‍या आणि सरकारमध्ये योग्य प्रतिनिधित्व मागणार्‍या बंगाली बांधवांचा काय दोष होता? असा सवाल राजनाथ सिंग यांनी केला. बंगाली बांधवांवरील अत्याचार, छळ अमानवी होता. अशावेळी पूर्व पाकिस्तानमधील जनतेला अन्याय व शोषणापासून मुक्ती देणे भारताचा राजधर्म, राष्ट्रधर्म व सैन्यधर्म होता’, असे राजनाथ सिंग म्हणाले.

पाकिस्तानला भारताबरोबरील थेट युद्धात कधीही विजय मिळाला नाही आणि छुप्या युद्धातही त्यांचा पराभव आणि भारताचा विजय निश्‍चित आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. यावेळी बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानच्या भारतद्वेषावर संरक्षणमंत्र्यांनी सडकून टीका केली.

भारताला पाकिस्तानकडून सतत युद्धाच्या धमक्या दिल्या जातात. पाकिस्तान आपल्या क्षेपणास्त्रांना देत असलेल्या नावावरून त्यांच्यामध्ये भारतद्वेष किती खचून भरलेला आहे, हे लक्षात येते. घौरी, गझनवी, अब्दाली या भारतावर आक्रमण करणार्‍यांची नावे पाकिस्तानने आपल्या क्षेपणास्त्रांना दिली आहेत. भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर या आक्रमकांनी आताच्या पाकिस्तानवरही आक्रमण केले होते, हे पाकिस्तानला कुणीतरी सांगायला हवे, अशी चपराक संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानला लागावली.

बांगलादेशमध्ये लोकशाही स्थापन करण्यात भारताचे मोठे योगदान आहे. गेल्या ५० वर्षात बांगलादेश विकासाच्या मार्गाने प्रगती करीत असून हे उदाहरण इतर देशांसाठी प्रेरणादायी असल्याचे, सांगून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी यासाठी बांगलादेशची प्रशंसा केली.

 

जनरल बिपीन रावत यांचा अखेरचा संदेश

इंडिया गेट येथे सुरू झालेल्या ‘स्वर्णिम विजय पर्व’ कार्यक्रमादरम्यान जनरल बिपीन रावत यांचा पूर्वमुद्रीत संदेश प्रसारित करण्यात आला. हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या एक दिवसआधी मंगळवारी त्यांंनी हा संदेश ‘स्वर्णिम विजय पर्वा’निमित्त जवानांसाठी ध्वनीमुद्रीत केला होता.

‘स्वर्णिम विजय पर्वानिमित्त मी भारतीय जवानांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. आपल्या प्राणाची आहुती देणार्‍या जवानांना मी श्रद्धांजली वाहतो. शहीदांच्या आठवणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या अमर जवान ज्योतीच्या छायेखाली हे विजय पर्व पार पडत आहे. मी सर्व देशवासियांना या विजय पर्वामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो’, असा संदेश जनरल रावत यांनी दिला होता. ‘अपनी सेनाओं पर है हमें गर्व| आओ मिलकर मनाएं विजय पर्वं|’, हे जनरल रावत यांचे अखेरचे शब्द आहेत.

leave a reply