चीनचे दडपण झुगारून भारतीय लष्कराने गलवान नदीवर पूल उभारला

नवी दिल्ली – लडाखच्या सीमाभागात भारत करीत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळेच बिथरलेल्या चीनने या क्षेत्रात घुसखोरी केल्याचे दावे केले जातात. याच कारणामुळे चीनच्या जवानांनी भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला चढवून भारतीय सैन्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. विशेषतः गलवान नदीवर भारत उभारीत असलेल्या पुलाचे बांधकाम रोखण्यासाठी चीनने भारतीय लष्कराला आव्हान देण्याची जोखीम पत्करल्याचे विश्लेषकांचे म्हणणे असते, मात्र चीनच्या नाकावर टिच्चून भारतीय सैन्याने गलवान नदीवर सुमारे ६० मीटर अंतराच्या पुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे. यामुळे सामरिक दृष्टया अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या दौलत बेग ओल्डी (डीबीओ) इथपर्यंत भारतीय सैन्याचा प्रवास सुकर होणार आहे.

भारतीय लष्कर, चीन, गलवान

लडाख तसेच चीनलगतच्या इतर सीमाभागात भारतीय लष्कर तसेच वायुसेना आपली क्षमता वाढविण्याच्या तयारीत असून गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रात झालेला पायाभूत सुविधांचा विकास भारतीय संरक्षण दलाचे बळ वाढवित आहे. चीनने भारताच्या इथल्या विकास प्रकल्पांवर वेळोवेळी आक्षेप घेतले होते. विशेषतः लडाखच्या सीमाभागातील भारताच्या विकास प्रकल्पांवर चीनने अधिक आक्रमकपणे आक्षेप नोंदविल्याचे वारंवार समोर आले होते. मात्र गलवान नदीवर पूल उभारण्याचा भारतीय लष्कराचा प्रयत्न चीनला चांगलाच खुपला होता यामुळे सीमाभागातील भारतीय लष्कराच्या हालचालींचा वेग अधिकच वाढेल या चिंतेने ग्रासलेल्या चीनने सदर क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

भारतीय लष्कर, चीन, गलवान

या पार्श्वभूमीवर चीनचे लष्कर समोर खडे ठाकलेले असताना भारतीय सैन्याने गलवान नदीवर सुमारे ६० मीटर इतका पूल उभारून आपली क्षमता दाखवून दिली आहे. यामुळे पावसाळ्याच्या काळात या नदीला पूर आलेला असताना देखील भारतीय सैन्याची हालचाल तसेच रासदीचा पुरवठा करणे सोपे जाणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या पुलामुळे भारतीय सैन्य जलदगतीने दौलत बेग ओल्डी तळावर पोहोचू शकते. समारीकदृष्ट्या हा तळ अतिशय महत्त्वाचा असल्याने या तळावर त्वरित कुमक तसेच रासदीचा पुरवठा निर्णायक बाब ठरू शकते. याची पुरेपूर जाणीव असलेल्या चीनने सदर पुलाचे बांधकाम होऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न केले होते पण आता भारतीय सैन्याच्या निर्धारासमोर चीनचे काही चालू शकले नाही हे नव्याने समोर येत आहे. भारतीय माध्यमांनीही सदर पुलाच्या बांधकामाची बातमी उचलून धरली आहे.

चीन बरोबरील तणाव वाढलेला असताना भारताच्या वायुसेना प्रमुखांनी लेह येथील वायुसेनेच्या हवाई तळाला भेट देऊन इथल्या सज्जतेचा आढावा घेतला व आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते श्रीनगर येथील वायुसेनेच्या तळाची पाहणी करण्याचेही वृत्त आहे. मात्र वायुसेनाप्रमुखांच्या या दौऱ्याचा अधिक तपशील देण्यास वायुसेनेने नकार दिला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही खबरदारी घेतली जात असल्याचे वायुसेनेने म्हटले आहे. असे असले तरी चीन लगतच्या सीमेवर वायुसेनेची ‘सुखोई -३०एमकेआय’, ‘मिराज-२०००’ आणि ‘जग्वार’ लढाऊ विमाने उड्डाण करीत असून याठिकाणी अमेरिकेकडून खरेदी करण्यात आलेले ‘अपाचे’ आणि ‘चिनूक हेलिकॉप्टर’ सुसज्ज स्थितीत ठेवण्यात आल्याची माहिती दिली जात आहे.

leave a reply