भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवाद्यांचे तळ उडवून दिले

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

नवी दिल्ली – गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्थ करून भारतीय लष्कर काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर वर्चस्व गाजवीत आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी जाहीर केले. काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या लष्कराची जबरदस्त चकमक सुरु असून त्या पार्श्वभूमीवर भारताचे संरक्षण मंत्र्यांनी केलेली ही विधाने पाकिस्तानला सज्जड इशारा देत आहेत. त्याचबरोबर अदृश्य शत्रू असलेल्या कोरोनाव्हायरसपासून संरक्षणदलाच्या मालमत्तेचे रक्षण केले जात असल्याची ग्वाही संरक्षणमंत्र्यांनी दिली.

भारताच्या भूमीवर पाऊल ठेवण्याआधीच आपले लष्कर देशाच्या शत्रूंचा नायनाट करीत आहे, असे संरक्षणमंत्र्यानी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तानच्या लष्करामध्ये जोरदार चकमकी झडत आहेत. पाकिस्तानचे लष्कर गोळीबार करुन दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये घुसविण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहे. पण भारतीय सैन्य त्यांचे हे डाव उधळून लावत आहेत.

काही दिवसांपूर्वी भारताचे लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांनी जम्मू-काश्मीरचा दौरा केला होता. व या दौर्‍यात त्यांनी नियंत्रण रेषेवरील सुरक्षेचा आढावा घेतला होता. आपल्या या भेटीत जनरल नरवणे यांनी पाकिस्तान अजूनही दहशतवाद्याची निर्यात करीत असल्याचा ठपका ठेवला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीला सहाय्य करणाऱ्या पाकिस्तानच्या लष्कराला चांगला धडा शिकविला जात असल्याची माहिती दिली आहे. यामुळे नजीकच्या काळात पाकिस्तानने कुरापती काढल्या तर त्याला जबरदस्त प्रत्युत्तर मिळेल, याची जाणीव भारताकडून करून दिली जात आहे.

कोरोनाव्हायरसचा फैलाव होत असताना भारतीय नौदलातील २१ जणांना या साथीची लागण झाल्याचे उघड झाले होते. भारतीय सेना दलांना या साथीपासून दूर ठेवण्यासाठी व या साथीचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक ती सारी खबरदारी घेतली जात असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे. कोरोनाव्हायरस हा अदृश्य शत्रु असून त्यापासून संरक्षण दलांची सुरक्षा करण्यासाठी योग्य ती दक्षता घेतली जात असल्याचे राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले.

leave a reply