भारतीय लष्कराच्या एलएसीजवळील हालचाली वाढल्या

Indian and Chinese troops and tanks disengaging from the banks of Pangong lake areaनवी दिल्ली – भारतीय लष्कराच्या सहा डिव्हिजन्स एलएसीवर तैनात करण्यात आल्याच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या होत्या. या दरम्यान लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी लडाखमधील एलएसीला भेट देऊन सुरक्षाविषयक पाहणी केली होती. त्याचपाठोपाठ उत्तराखंडमधील चीनच्या सीमेजवळ भारतीय लष्कर आणि ‘इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस-आयटीबीपी’च्या जवानांचा ‘आयबीईएक्स’ नावाचा युद्धसराव सुरू झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. तसेच लष्कराच्या ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन-बीआरओ’ने चीनच्या सीमेलगत असलेल्या दौलत बेग ओल्डी हवाई तळाजवळच्या रस्त्यांच्या बांधकामाला वेग दिल्याचे दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून चीनलगतच्या एलएसीवरील भारताच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यातच भारतीय नेते व लष्करप्रमुखांनी चीनबाबत केलेली आक्रमक विधाने लक्ष वेधून घेत आहेत. लडाखच्या एलएसीवरील सीमावाद सोडविण्यात चीनला स्वारस्य राहिलेले नाही, असे लष्करप्रमुख जनरल पांडे म्हणाले होते. त्याच्यानंतर जनरल पांडे यांनी लडाखच्या एलएसीला भेट दिली होती. यानंतर भारतीय लष्कराने आपल्या सहा डिव्हिजन्स एलएसीवर तैनात केल्याचे उघड झाले होते. चीनला भारताच्या विरोधात लष्करी हालचाली करण्याची एकही संधी मिळू नये, यासाठी ही तैनाती वाढविण्यात आल्याचा दावा केला जातो.

rajnathइतर वेळी भारतीय लष्कराच्या सीमेलगतच्या हालचालींवर नजर ठेवून त्याबाबत अतिशय संवेदनशीलता दाखविणारा चीन, भारतीय लष्कराच्या या हालचालींवर काहीही बोलायला तयार नाही. ही बाब देखील चीनच्या हालचालींचीबाबतचा संशय अधिकच वाढविणारी ठरते. या पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कराने चीनच्या साऱ्या कारवायांवर बारकाईने नजर ठेवल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते. काही दिवसांपूर्वी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनीही चीन लडाखच्या पँगाँग सरोवर क्षेत्रात करीत असलेल्या पुलाच्या बांधकामावर आक्षेप नोंदविला होता. तसेच भारत या बांधकामावर नजर ठेवून असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले होते.

या दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी 2020 साली लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाबाबत सूचक विधाने केली आहेत. गलवानच्या खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराने दाखविलेल्या धैर्य व पराक्रमाची सारी माहिती देशासमोर आणली तर प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने फुलेल, असे संरक्षणमंत्री शुक्रवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात म्हणाले होते. तसेच आपल्या अमेरिका दौऱ्यात भेटलेल्या काही अनिवासी भारतीयांनी जगाचा भारताकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात अमूलाग्र बदल झाल्याचे सांगितले, याचा उल्लेख राजनाथ सिंग यांनी केला. याआधी भारताकडून येणाऱ्या विधानांकडे कुणी गंभीरपणे पाहत नव्हते. पण आता मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत जे काही बोलतो, त्याकडे लक्षपूर्वक पाहिले जाते, असे या अनिवासी भारतीयांनी आपल्याला सांगितल्याचे राजनाथ सिंग म्हणाले.

leave a reply