नवी दिल्ली – भारतीय नागरिक ‘हर्ड इम्युनिटी’ पासून खूप दूर आहे. त्यामुळे कोरोनाच्या बाबतीत कोणतीही हलगर्जी बाळगून चालणार नाही. गंभीरतेने नियमांचे पालन करावे लागेल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. तसेच ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’कडून (आयसीएमआर) कोरोनाची लागण दुसऱ्यांदा रुग्णांना का होत आहे यावर अभ्यास केला जात आहे, असेही आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. मात्र अशा रुग्णांची संख्या सध्या कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘आयसीएमआर’ने केलेल्या दुसऱ्या सीरो सर्वेक्षणाचा दाखला देत केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ही माहिती दिली.
देशातील कोरोनाने बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ८२.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. सुमारे ५० लाख कोरोना रुग्ण आतापर्यंत बरेच झाले आहेत. मात्र त्याचवेळी या साथीने प्राण गमावणाऱ्या रुग्णांची संख्या आणि नव्या संसर्गित रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. देशात रविवारी रात्रीपर्यंत या साथीने बळी गेलेल्यांची संख्या सुमारे ९५ हजारांपर्यंत पोहोचली. तसेच एकूण रुग्णाची संख्या ६० लाख ५० हजारांवर गेली.
येत्या चार-पाच दिवसात देशातील कोरोना साथीच्या बळींची संख्या एक लाखाच्या पुढे जाईल, असा अंदाज व्यक्त केला जातो. अमेरिका मेक्सिको नंतर भारतात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. देशात कोरोनाने दगावणाऱ्या रुग्णांचा दर दोन टक्के आहे. मात्र या राष्ट्रीय सरासरीपेक्षा काही राज्यात मृत्युदर जास्त असून ही गोष्ट चिंताजनक ठरत आहे . महाराष्ट्रात कोरोनाचा मृत्युदर २.६६ टक्के आहे रविवारीही महाराष्ट्रात या साथीने ३८० जणांचा बळी गेला १८०५६ नव्या रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील या साथीने दगावणाऱ्यांची संख्या ३५ हजार ५७१ वर पोहोचली आहे.
रविवारी तामिळनाडूत ७२ जणांचा बळी गेला आणि ५,६७९ नव्या रुग्णांची नोंद झाली. आंध्र प्रदेशात ४८ जणांचा बळी गेला, तर ७ हजार नवे रुग्ण आढळले. कर्नाटकात चोवीस तासात ८६ जण दगावले आणि ८,८११ नवे रुग्ण सापडले. उत्तर प्रदेशात एका दिवसात कोरोनाने ८४ जणांचा मृत्यू झाला. तसेच ४ हजार ५१९ नवे रुग्ण आढळले.