लडाखच्या ‘एलएसी’वर भारतीय लष्कराची मॅकेनाईज् इंफंट्री सज्ज

नवी दिल्ली – लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) काय चालले आहे, हे जाणून घेण्यासाठी माध्यमे अतिशय उत्सुक आहेत, हे मी समझू शकतो. पण एका मर्यादेच्या बाहेर जाऊन या गोष्टीची अधिक माहिती देता येऊ शकत नाही. देशाच्या सीमा सुरक्षित राखण्याची लष्कराची क्षमता व राजनैतिक पातळीवरील कौशल्य यावर सर्वांनी दृढविश्वास दाखवायला हवा, असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. त्यांचे हे उद्‍गार प्रसिद्ध होत असतानाच, भारतीय लष्कराची भीष्म, अर्जुन रणगाड्यांसह लांब पल्ल्याच्या तोफांनी सुसज्ज असलेली मॅकेनाईज् इंफंट्री लडाखच्या ‘एलएसी’वर तैनात करण्यात आली आहे.

मॅकेनाईज् इंफंट्री

‘एलएसी’वर लष्करी हालचाली वाढवून भारतावर दडपण टाकण्याचा प्रयत्‍न भारतीय लष्कराने मॅकेनाईज् इंफंट्री तैनात करुन चीनवरच उलटवल्याचे दिसत आहे. नवी दिल्ली येथील एका कार्यक्रमात दरम्यान माध्यमांशी बोलताना, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी चीनशी वाटाघाटी सुरू आहेत पण, याचे सारे तपशील आत्ताच उघड करता येत नाहीत, असे स्पष्ट केले. त्याचवेळी ‘एलएसी’बाबतची सारी माहितीही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उघड करणे योग्य ठरणार नाही, याचीही जाणीव परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी करुन दिली. चीन ‘एलएसी’वर मोठ्या प्रमाणात जवान व शस्त्रास्त्रांची तैनाती करुन भारतावर दबाव वाढविण्याच्या तयारीत आहे. भारताने इथून माघार घेतली नाही तर युद्ध पेट घेईल, असे इशारे चीन आपल्या सरकारी मुखपत्राद्वारे देत आहे.

मॅकेनाईज् इंफंट्री

हिवाळ्यात भारतीय सैन्याने माघार घेतली तर मोठ्या संख्येने या क्षेत्रात तैनाती करुन भारतावर कुरघोडी करण्याची कुटील योजना चीनने आखली असावी, असा संशय भारतीय मुत्सद्दी व माजी लष्करी अधिकारी व्यक्त करीत आहेत. याची पूर्व तयारी चीन करीत आहे, असे गेल्या काही आठवड्यातील चीनच्या हालचालींवरुन समोर येत आहे. मात्र, भारताने लष्करी व राजनैतिक पातळीवर चीनच्या विरोधात निर्णायक भूमिका घेतली आहे आणि यामुळेच चीनचे सारे डावपेच असफल ठरत आहेत. लडाखच्या ‘एलएसी’वर चीनच्या तोडीस तोड तैनाती करुन भारतीय लष्कराने चीनला धक्का दिला आहे. तसेच तिबेटच्या क्षेत्रात ‘लाईव्ह फायरिंग’ युद्धसराव करुन आव्हान देणार्‍या चीनच्या विरोधात भारतीय लष्कराची मॅकेनाईज् इंफंट्री तैनात करण्यात आली आहे.

मॅकेनाईज् इंफंट्रीभीष्म टी-९०, अर्जुन हे रणगाडे तसेच चिलखती वाहने आणि लांब पल्ल्याच्या तोफा यांची ‘एलएसी’वरील तैनाती चीनला धडकी भरविणारी ठरते. अत्यंत उंचावरील या क्षेत्रात सैनिक आणि शस्त्रास्त्रे युद्धसज्ज ठेवणे हे फार मोठे आव्हान आहे खरे, पण भारतीय लष्कराचा जोश, कठोर प्रशिक्षण यामुळे ही बाब शक्य झाली आहे, असे मेजर जनरल अरविंद कपूर यांनी म्हटले आहे. भारताची मॅकेनाईज् इंफंट्री कुठल्याही क्षेत्र आणि हवामानात आपले कर्त्यव्य पार पाडू शकते, असे या मॅकेनाईज् इंफंट्रीच्या एका अधिकार्‍याने स्पष्ट केले आहे. चीनने मोठ्या संख्येने घुसखोरीचा प्रयत्‍न केलाच तर त्याला गोळीबाराने प्रत्युत्तर देण्याचे आदेश भारतीय लष्कराला याआधीच मिळाले होते. आता मॅकेनाईज् इंफंट्रीची तैनाती चीनला लष्करी हालचाली करतानाही अनेकदा विचार करण्यास भाग पाडेल.

leave a reply