भारतीय नौदलाची ‘टास्क फोर्स’ साऊथ चायना सीमध्ये

नवी दिल्ली – चीन दावा सांगत असलेल्या ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रात भारत आपल्या नौदलाची ‘टास्क फोर्स’ रवाना केली आहे. या क्षेत्रातील देशांबरोबरील सुरक्षाविषयक भागीदारी दृढ करण्यासाठी ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ धोरणानुसार हा निर्णय घेतला जात आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी ही माहिती दिल्याचे बोलले जाते. सध्या या सागरी क्षेत्रातील अमेरिका व ब्रिटनच्या नौदलाची तैनाती हा चीनच्या चिंतेचा विषय बनला आहे. त्याचबरोबर जर्मन नौदलाकडूनही या क्षेत्रात तैनाती केली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर, भारतीय युद्धनौकांचा समावेश असलेल्या ‘टास्क फोर्स’ची साऊथ चायना सीमधली तैनाती हा चीनला वठणीवर आणण्याच्या योजनेचा भाग ठरत असल्याचे दिसते.

भारतीय नौदलाची ‘टास्क फोर्स’ साऊथ चायना सीमध्येभारतीय नौदलाच्या या टास्क फोर्समध्ये ‘आयएनएस रणविजय’, ‘आयएनएस शिवालिक’, ‘आयएनएस कदमत’ आणि ‘आयएनएस कोरा’ या युद्धनौकांचा समावेश आहे. फिलिपाईन्स, व्हिएतनाम, सिंगापूर, इंडोनेशिया या देशांबरोबरच ऑस्ट्रेलियाला देखील या युद्धनौका भेट देतील. तसेच या युद्धनौका मलाबार-21 युद्धसराव करणार आहेत. या युद्धसरावात अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलियाचा सहभाग असेल. सध्या साऊथ चायना सी क्षेत्रातील घडामोडींना प्रचंड प्रमाणात वेग आला असून पाश्‍चिमात्य देशांनी या क्षेत्रावर दावा ठोकणार्‍या चीनला वेसण घालण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी अमेरिकन नौदलाच्या इंडो-पॅसिफक कमांडने आक्रमक डावपेचांचा वापर सुरू केला आहे.

काही महिन्यांपूर्वी फ्रान्सची विमानवाहू युद्धनौका या क्षेत्रात तैनात होती. आता ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस क्विन एलिझाबेथ’ आपल्या ताफ्यातील युद्धनौकांसह इथे गस्त घालत आहे. यावर चीनने घेतलेले आक्षेप ब्रिटनने धुडकावले आहेत. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात जर्मन नौदलाची युद्धनौका या क्षेत्रात येणार असल्याचे वृत्त आहे. या पार्श्‍वभूमीवर, भारतीय नौदलाच्या टास्क फोर्सची साऊथ चायना सी क्षेत्रातील तैनाती, चीनच्या चिंतेत नवी भर घालणारी ठरू शकते.

याआधी हिंदी महासागर क्षेत्रातील भारताच्या नैसर्गिक प्रभावाला आव्हान देणार्‍या चीनला उत्तर देण्यासाठी भारताने साऊथ चायना सी क्षेत्रातील आपला प्रभाव वाढवावा, असा सल्ला विश्‍लेषकांकडून दिला जात होता. भारतीय नौदलाकडे ती क्षमता आहे आणि चीनच्या दहशतीखाली असलेले साऊथ चायना सी क्षेत्रातील देश देखील भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत, असे या विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply