युक्रेनमधील युद्धात भारतीय विद्यार्थ्याचा बळी

नवी दिल्ली – नवीन शेखरप्पा जी नावाचा कर्नाटकच्या विद्यार्थ्याचा युक्रेनमधील संघर्षात बळी गेला आहे. युक्रेनच्या खारकिव्हमध्ये रशियाने चढविलेल्या हल्ल्यात नवीन याचा बळी गेल्याचे सांगितले जाते. यानंतर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी रशिया तसेच युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करून भारतीय विद्यार्थ्यांना परतीसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शेखरप्पा जी याच्या कुटुंबियांशी फोनवरून बोलून त्यांचे सांत्वन केल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी पंतप्रधान तसेच परराष्ट्रमंत्र्यांनी युक्रेनबाबतच्या परिस्थितीची माहिती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिली आहे.

बळीयुक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना जलदगतीने मायदेशी आणण्यासाठी वायुसेनेने मोहीम हाती घ्यावी, असे आदेश पंतप्रधानांनी दिले आहेत. यानुसार वायुसेनेची अवजड वाहतूक करणारी ‘सी-१७’ विमाने युक्रेनला जाणार असून मोठ्या प्रमाणात भारतीयांना मायदेशी आणले जाईल. मात्र युक्रेनवर रशियाचे घणाघाती हल्ले सुरू असताना, या सुरक्षित प्रवासासाठी भारताने रशिया व युक्रेनशीही चर्चा सुरू केली आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी रशियन परराष्ट्रमंत्री तसेच युक्रेनच्याही परराष्ट्रमंत्र्यांशी यावर चर्चा केली. त्यामुळे भारतीयांना मायदेशी आणण्याच्या मोहिमेला अधिकच वेग मिळू शकेल.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोंविंद यांना पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमधील संकटाबाबतचे तपशील दिले आहेत. तसेच या देशातून भारतीयांना परत आणण्यासाठी हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन गंगा’चीही पंतप्रधानांनी माहिती राष्ट्रपतींना दिली. तर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनीही राष्ट्रपतींना याबाबतचे तपशील दिल्याचे वृत्त आहे. अजूनही पूर्व युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी अडकून पडलेले आहेत. त्यांची अवस्था बिकट असल्याचे युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

युक्रेनमधील हे युद्ध उग्ररूप धारण करीत असताना, भारताने दोन्ही बाजूंना रक्तापात थांबविण्याचे आवाहन केले आहे. सचोटी व निष्ठेने केलेला सातत्यपूर्ण संवाद हाच युक्रेनची समस्या सोडविण्यासाठी एकमेव मार्ग आहे. राजनैतिक स्तरावरील वाटाघाटींखेरीज ही समस्या सुटणे शक्यच नाही, असा भारताच्या सरकारचा विश्‍वास असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत टी. एस. तिरूमुर्ती यांनी स्पष्ट केले.

रशिया व युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर केलेल्या चर्चेतही भारताच्या पंतप्रधानांनी ही भूमिका ठामपणे मांडली होती, असे राजदूत तिरूमुर्ती यांनी म्हटले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची तातडीने सुटका करण्यासाठी भारत आवश्यक ते सारे प्रयत्न करीत असल्याची माहिती यावेळी राजदूत तिरूमुर्ती यांनी दिली. तसेच या आपत्तीत अडकलेल्यांना मानवी सहाय्य पुरवून इतर देशांच्याही नागरिकांची सुटकेसाठी प्रयत्न करण्याचा प्रस्ताव भारताने संयुक्त राष्ट्रसंघात दिला.

leave a reply