भारतीय सैनिकांनी सिक्कीम सीमेवर चीनचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पडला – संघर्षांत दोन्ही देशाचे सैनिक जखमी

गंगटोक – सिक्कीमच्या नाकू ला सेक्टरमध्ये भारतीय सीमेत घुसखोरी करू पाहणाऱ्या चिनी जवानांना भारतीय सैनिकांनी रोखून माघारी फिरण्यास भाग पाडले. यावेळी चिनी जवानांबरोबर भारतीय सैनिकांची झटापट झाली. यामध्ये काही चिनी जवान जखमी झाले आहेत. चार भारतीय सैनिकही या संघर्षांत जखमी झाले असून चर्चेनंतर दोन्ही देशाचे सैनिक पुन्हा आपापल्या चौक्यांवर माघारी परतले. २०१७ साली उत्तर सिक्किम सीमेवरच डोकलामच्या ट्राय जंक्शन भागात भारतीय आणि चिनी सैनिक ७३ दिवस एकमेकांसमोर खडे ठाकले होते. त्यानंतर तीन वर्षांनी उत्तर सिक्कीमला लागून असलेल्या सीमेवर दोन्ही देशांचे सैनिकांमध्ये असा संघर्ष घडला आहे.

शनिवारी सिक्कीमच्या नाकू ला सेक्टर भागात घुसखोरी करण्याचा चिनी सैनिकांचा डाव भारतीय जवानांनी हाणून पडला. भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना रोखून धरले आणि भारतीय सीमेतून मागे ढकलले. भारत आणि चीनचे सुमारे १५० जवान समोरासमोर खडे ठाकले होते. चिनी सैनिकांना भारतीय सीमा क्षेत्रातून ढकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जवानांची चिनी सैनिकांबरोबर झटापटही झाली. यामध्ये काही चिनी सैनिक जखमी झाले आहेत. चीनचे सहा सैनिक जखमी झाल्याचा दावा काही बातम्यांमध्ये करण्यात आला आहे. हा वाद नंतर प्रोटोकॉल अंतर्गत चर्चेतून मिटविण्यात आला आणि चीन व भारतीय सैनिक आपापल्या चौक्यांवर परतले.

भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर खडे ठाकले तो भाग समुद्रसपाटीपासून पाच हजार मीटर उंचीवर असून अरुणाचल, लडाख आणि उत्तराखंडच्या काही भागांप्रमाणे चीन या भागावरही आपला दावा सांगतो. ईशान्य भारतातील राज्यांना जोडणारा सिलीगुडी कॉरिडॉर येथून जवळ असल्याने हा भाग व्यूहरचनात्मकदृष्ट्या खुपच महत्वाचा आहे. उत्तर सिक्कीममधील सीमेपासून पाच किलोमीटरवर असलेल्या चुंबी घाटीपर्यंत चीनने रस्ता उभारला आहे. येथील भागाचे व्यूहरचनात्मक महत्व ओळखूनच चीन उत्तर सिक्कीमवर आपला दावा सांगतो व येथे चिनी सैनिकांकडून घुसखोरीचे प्रयत्न होत असतात.

तीन वर्षांपूर्वी भारतीय सैनिकांनी डोकलाममध्ये रास्ता उभारण्याचा आणि या भागावर आपली पकड वाढविण्याचा चीनचा डाव हाणून पडला होता. भारत, भूतान आणि चीनच्या सीमा भिडणाऱ्या या भागात भारताने घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळे ७३ दिवसाने चिनी सैनिकांना माघारी फिरावे लागले. यामुळे चीनच्या प्रतिष्ठेला जबर धक्का बसला होता. तर भारताने ज्या पद्धतीने युद्धाच्या धमक्या देणाऱ्या चीनला माघार घेण्यास भाग पाडले त्याची दखल जगभरातील विश्लेषकांनी घेतली होती.

त्यानंतर डोकलामजवळील आपल्या भागात चीनने सैनिकांची तैनाती वाढविली असली तरी पुन्हा दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर ठाकतील अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. मात्र शनिवारी पुन्हा चिनी सैनिकांनी कुरापत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळीही सतर्क भारतीय सैनिकांनी चीनचा हा डाव हाणून पडला आणि डोकलामप्रमाणे यावेळीही चीनला माघार घेण्यास भाग पाडले.

leave a reply