इराणच्या छाबहार बंदराचा विकास करून भारताचा चीनच्या ‘बीआरआय’ला पर्याय

नवी दिल्ली – इराणमध्ये ४०० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करून चीनने खळबळ माजविली होती. यामुळे इराणचे छाबहार बंदर विकसित करून मध्य आशियाई देशांबरोबरील व्यापारी सहकार्य प्रस्थापित करण्याची भारताची योजना धुळीस मिळेल, अशी चिंता व्यक्त करण्यात येत होती. पण आता मात्र चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्ह’चा (बीआरआय) पर्याय भारताने इराण व मध्य आशियाई देशांसमोर ठेवल्याची चर्चा सुरू झाली आहे. याद्वारे भारताने एकाच वेळी चीन व पाकिस्तानचे महत्त्व कमी करून टाकल्याचे दावेही समोर येऊ लागले आहेत.

इराणने आपल्या छाबहार बंदराच्या विकास प्रकल्पातून भारताला बाजूला सारले, अशा बातम्या काही काळापूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. पण प्रत्यक्षात भारताने या बंदराचा वापर करून अफगाणिस्तानमार्गे मध्य आशियाई देशांना पर्यायी व्यापारी मार्ग उभारून देण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भारत-इराण व उझबेकिस्तानमध्ये पार पडलेली चर्चा या संदर्भातच होती. यापुढील अशाच स्वरुपाची त्रिपक्षीय चर्चा भारत आयोजित करणार असून यामध्ये इराणसह अफगाणिस्तानचा देखील समावेश असेल, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे.

नजिकच्या काळात इतर मध्य आशियाई देशांबरोबरही इराणसह त्रिपक्षीय चर्चा आयोजित केली जाऊ शकते, यासाठी भारत तयार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. यामुळे भारत छाबहार बंदराच्या विकास प्रकल्पापासून दूर गेला असून उलट याचा वापर करून भारत मध्य आशियाई देशांशी व्यापारी जोडणीचा प्रयत्न करीत असल्याचे उघड होत आहे. सप्टेंबर महिन्यात भारताने छाबहार बंदरासाठी लागणार्‍या यंत्रसामुग्रीसाठी चिनी कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करून टाकले होते. यामुळे या बंदराच्या विकासावर परिणाम होईल व भारत अडचणीत येईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण भारताने अवघ्या तीन महिन्यात हे कंत्राट पाश्‍चिमात्य देशातील कंपनीला देऊन हे काम पुढे नेल्याचे दिसत आहे.

छाबहार बंदरापासून पुढे जाणार्‍या रेल्वे लाईन्ससाठी सहाय्य करा, असे आवाहन इराणने भारताला केले आहे. तसेच ट्रम्प यांचा कार्यकाळ सरल्यानंतर भारत इराणकडून आधीप्रमाणे इंधनाची खरेदी सुरू करणार आहे. याचा सुपरिणाम दोन्ही देशांच्या संबंधांवर होईल. तसेच छाबहार बंदरामुळे भारताचा अफगाणिस्तानसह मध्य आशियाई देशांबरोबरील व्यापार सुलभतेने होऊ शकेल. चीनची अर्थव्यवस्था धोक्यात आलेली असताना, मध्य आशियाई देश भारताकडे अधिक अपेक्षेने पाहत आहेत. म्हणूनच यासंदर्भात भारताने घेतलेला पुढाकार अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

leave a reply