एलएसीजवळील चीनच्या बांधकामावर भारताची करडी नजर

एलएसीजवळील चीनच्या बांधकामावर भारताची करडी नजर

नवी दिल्ली – लडाखच्या एलएसीजवळील क्षेत्रात चीन करीत असलेले बांधकाम ही चिंताजनक बाब ठरते, असा इशारा अमेरिकन लष्कराच्या पॅसिफिक कमांडचे प्रमुख जनरल चार्ल्स फ्लिन यांनी दिला होता. त्यावर भारत आणि चीनची प्रतिक्रिया आलीआहे. चीनच्या बांधकामाकडे भारताची नजर रोखलेली असून आपल्या सुरक्षेसाठी भारत योग्य ती पावले उचलत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तर जनरल फ्लिन यांच्या वक्तव्यामुळे संतापलेल्या चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिका ‘आगीत तेल’ ओतण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला. सीमावाद सोडविण्यासाठीआवश्यक असलेली इच्छा व क्षमता भारत आणि चीनकडे आहे, त्यामुळे अमेरिकेने यात दखल देऊ नये, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले.

Arindam-Bagchiलडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये चर्चेची नवी फेरी लवकरच सुरू होईल. त्याच्या आधी एलएसीवरील तणाव कमी करण्याबाबत चीन पुरेसा गंभीर नसल्याचे आरोप भारताकडून केले जात आहेत. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी चीनला भारताबरोबरील सीमावाद सोडविण्यात स्वारस्य नसून चीनला सीमावाद जिवंत ठेवायचा असल्याचे म्हटले होते. त्यातच चीनने लडाखच्याएलएसीजवळील काही भागात लष्करी पायाभूत सुविधांसाठी बांधकाम सुरू केल्याच्या बातम्या आल्या होत्या. हा भूभाग भारताचाच असला तरी 1960 सालापासून त्यावर चीनचा अवैध कब्जा आहे, याची जाणीव भारताने करून दिली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने वेळीच हा खुलासा करून चीनच्या अपप्रचाराला उत्तर दिले होते.

आपण घुसखोरी करून भारताचा भूभाग बळकावला आणि त्यावर लष्करी बांधकाम सुरू केल्याचा आभास चीन निर्माण करू पाहत होता. मात्र परराष्ट्र मंत्रालयाने चीनला तशी संधी मिळू दिली नाही. असे असले तरी गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या सीमेजवळ चीन करीत असलेल्या बांधकामाची अमेरिका विशेष दखल घेत असल्याचे दिसते. अमेरिकन संसदेच्या समितीसमोर होणाऱ्या सुनावणीत वारंवार चीनपासून भारताला संभवणाऱ्या धोक्यांची चर्चा केली जात आहे. त्याचवेळी अमेरिकेचे वरिष्ठ लष्करी अधिकारीही चीनच्या कारवाया भारतासाठी घातक ठरतील, असे दावे करीत आहेत. भारताच्या सुरक्षेसाठी अमेरिकेकडून दाखविण्यात येत असलेली ही ‘संवेदनशीलता’ निराळेच संकेत देत आहे.

युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर, रशियाच्या विरोधात जाण्यास भारताने नकार दिला होता. यानंतर अमेरिकेने भारताला धमक्या देण्याचे सत्र सुरू केले होते. पुढच्या काळात चीनने भारतावर हल्ला चढविला, तर भारताच्या सहाय्यासाठी रशिया नाही अमेरिकाच पुढे येईल, असे अमेरिकेच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी भारतात येऊन बजावले होते. पुढच्या काळातही अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकारी व नेत्यांनी जवळपास याच शब्दात भारताला इशारे दिले होते. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतीच स्लोव्हाकिया आणि झेक प्रजासत्ताक या युरोपिय देशांचा दौरा केला होता. या दौऱ्यातही रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला, तसेच चीनने भारताबाबत केले तर भारताची बाजू कोण घेईल? असा प्रश्न परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना विचारण्यात आला होता. याला भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिलेले सणसणीत उत्तर अतिशय गाजले होते.

चीन भारतावर हल्ला चढविण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत आमच्या सहाय्याखेरीज भारतासमोर दुसरा पर्याय नसेल. म्हणूनच भारताने आम्ही करीत असलेल्या मागणीनुसार रशियाच्या विरोधात भूमिका स्वीकारली पाहिजे, असा संदेश अमेरिका व युरोपिय देश देत आहेत. पण युरोपिय देशांच्या दौऱ्यात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी त्याला जबरदस्त उत्तर दिले होते. चीनबरोबरील समस्या हाताळण्याची धमक भारताकडे आहे, याची जाणीव जयशंकर यांनी नेमक्या शब्दात करून दिली होती. चीनच्या सरकारी माध्यमांनीही याचे समर्थन केले होते.

आता अमेरिकेचे जनरल चार्ल्स फ्लिन यांनी चीनबाबत भारताला दिलेल्या इशाऱ्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सडकून टीका केली आहे. अमेरिका आगीत तेल ओतून वाद भडकवित असल्याचा ठपका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी केला. तसेच भारत व चीनकडे सीमावाद सोडविण्यासाठी लागणारी इच्छा व क्षमता असल्याचेही लिजिआन यांनी म्हटले आहे. यामुळे भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची भाषा चीनही बोलत असल्याचे समोर येत आहे.

leave a reply