भारताच्या कोरोना लसी जगाची साथीपासून सुटका करीत आहेत

- आंतरराष्ट्रीय तज्ज्ञाकडून प्रशंसा

साथीपासून सुटकाह्युस्टन – भारताने जगातील प्रमुख संस्थांबरोबर सहकार्याची भूमिका घेऊन अनेक देशांना कोरोनाच्या लसींचा पुरवठा केला व जगाची कोरोनाच्या साथीपासून सुटका केली, या शब्दात आंतरराष्ट्रीय वैद्यकतज्ज्ञ डॉक्टर पीटर हॉटेझ यांनी भारताची प्रशंसा केली. भारताच्या या योगदानाकडे आंतरराष्ट्रीय समुदायाला दुर्लक्ष करता येणार नाही, असेही डॉक्टर हॉटेझ यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनीही, कोरोना लसीबाबतच भारताची कामगिरी इतर देशांच्या तुलनेत उठून दिसणारी आहे, असे गौरवोद्गार काढले आहेत.

अमेरिकेतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन’चे डीन असलेले हॉटेझ हे लसीकरणाच्या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ मानले जातात. त्यांनी एका वेबिनारमध्ये बोलताना भारताची प्रशंसा केली. भारतात कोरोना प्रतिबंधक दोन लसी तयार झाल्या आहेत. विकसित देशांनाही या आघाडीवर भारताइतके यश मिळविता आले नव्हते. यामुळे जगाची फार्मसी ही भारताची ओळख अधिकच दृढ बनली आहे. कोरोनाच्या लसी विकसित करून भारताने जगाला फार मोठी भेट दिली आहे, असे हॉटेज म्हणाले. जगभरातील संस्थांशी सहकार्य करून भारताने या लसी विकसित केल्या आणि भारताचे हे योगदान कधीही दुर्लक्षित करता येण्याजोगे नाही, असे हॉटेज यांनी आवर्जुन म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनीही भारताच्या लसीकरणाबाबतच्या भूमिकेचे कौतुक केले. जगाच्या तुलनेत भारताने लसीकरणाबाबत स्वीकारलेले धोरण अधिक प्रभावशाली असून ते ठळकपणे समोर येत असल्याचा दावा गीता गोपीनाथ यांनी केला. याआधी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही कोरोनाच्या लसी विकसित करणार्‍या भारताची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. भारताने आत्तापर्यंत ६२ देशांना ५५ लाखांहून अधिक कोरोनाच्या लसींचे डोस पुरविले आहेत. यामध्ये गरीब व अविकसित देशांचा समावेश आहे. या देशांना विकसित देशांनीही लसी पुरविण्यास नकार दिला होता. ऑस्ट्रेलियासारख्या देशाला लस पुरविण्याचे नाकारून युरेपिय देशांनी आपल्या देशातील मागणी आधी पूर्ण केली जाईल, असे धोरण स्वीकारले होते. कोरोनाच्या लसीवरून जगभरात वाद सुरू झालेला असतानाच, भारताने या आघाडीवर स्वीकारलेले धोरण अतिशय स्वागतार्ह ठरते. याचे फार मोठे राजनैतिक लाभ भारताला मिळतील, असा विश्‍वास व्यक्त केला जातो.

leave a reply