भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची युरोपिय देशांना ‘समज’

व्हिएन्ना – रशियाबरोबरील भारताच्या सहकार्यावर शेरेबाजी करून भारताला नैतिकतेचे धडे देऊ पाहणाऱ्या युरोपिय देशांना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी खडे बोल सुनावले आहेत. एका मुलाखतीत भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी युरोपसाठी इशाराघंटा वाजत असल्याचे बजावले आहे. 2008 साली आलेल्या आर्थिक मंदीनंतर युरोपिय देशांनी बचावात्मक भूमिका स्वीकारली आणि आपल्याच कोशात आपली प्रगती करीत राहण्याचे धोरण स्वीकारले. यामुळे अतिशय महत्त्वाच्या सुरक्षाविषयक मुद्यांकडे युरोपिय देशांनी दुर्लक्ष केले आणि आंतरराष्ट्रीय समस्या आपल्यापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न केले, असे टीकास्त्र जयशंकर यांनी सोडले. मात्र अमेरिकेला या समस्यांची जाणीव झाली आणि अमेरिकेने भारतासारख्या देशाबरोबरील सहकार्यासाठी वेळीच पावले उचलली, याचीही जाणीव जयशंकर यांनी करून दिली.

S-Jaishankarआपण सध्या घातक काळातून प्रवास करीत आहोत आणि जागतिक व्यवस्थेत बदल होण्यासाठी बराच काळ जावा लागेल याची जाणीव अमेरिकेला सर्वात आधी झाली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व त्यानंतर सत्तेवर आलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फार मोठे मतभेद होते. मात्र अमेरिकेच्या भारताबरोबरील सहकार्यवर हे दोन्ही नेते ठाम होते, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले. स्पष्टपणे उल्लेख केलेला नसला, तरी चीनपासून संभवणारा धोका लक्षात घेऊन भारताबरोबर सहकार्य केल्याखेरीज पर्याय नाही, हे अमेरिकन नेत्यांना वेळीच कळले, हे परराष्ट्रमंत्री जयशंकर राजनैतिक भाषेत या मुलाखतीत दिला. मात्र मात्र युरोपिय देशांमध्ये ही स्पष्टता अजूनही आलेली नाही, असा टोला जयशंकर यांनी लगावला.

आजही जागतिक व्यवस्था बऱ्याच प्रमाणावर पाश्चिमात्य देशांवर आधारलेली आहे. त्यात बदल होऊन ही व्यवस्था बहुपक्षीय असावी, यात प्रत्येक देशाला वेगवेगळ्या आघाडीवरील आपल्या धोरणाला अनुकूल असलेल्या देशांशी सहकार्य करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर पुढे म्हणाले. भारताच्या रशियाबरोबरील सहकार्याचे समर्थन करताना जयशंकर यांनी या सहकार्याच्या मागे देखील पाश्चिमात्य देश असल्याची बाब जयशंकर यांनी लक्षात आणून दिली. शीतयुद्धाच्या काळात भारताला शस्त्रास्त्रे पुरविण्यास नकार देऊन अमेरिकेने पाकिस्तानातील हुकूमशहांना शस्त्रे पुरविली होती. यामुळे भारताला सोव्हिएत रशियाकडून शस्त्रे खरेदी करावी लागली आणि भारताने ही शस्त्रास्त्रांची खरेदी आपल्या संरक्षणासाठी केलेली होती, याची आठवण जयशंकर यांनी करून दिली.

याचा अर्थ भारत हा रशियाचा सहकारी देश आहे का? असा प्रश्न मुलाखतकाराने केल्यानंतर, जयशंकर यांनी भारताचा अशा सहकाऱ्यांच्या आघाड्यांवर विश्वास नसल्याचे स्पष्ट केले. भारत स्वतंत्रपणे इतर देशांशी सहकार्य करतो, कुणाच्या आघाडीमध्ये सहभागी होत नाही, ही पाश्चिमात्य संकल्पना आहे, असे जयशंकर पुढे म्हणाले. दरम्यान, सायप्रस व त्यानंतर ऑस्ट्रिया या युरोपिय देशांच्या दौऱ्यावर असताना, भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी युरोपिय देश भारताकडे अजूनही संकुचित मानसिकतेतून पाहत असल्याचे लक्षात आणून दिले आहे. मात्र सायप्रस व ऑस्ट्रियासारख्या छोट्या युरोपिय देशांबरोबरील भारताचे सहकार्य वाढत असल्याचे जयशंकर यांनी या दौऱ्यात आवर्जुन स्पष्ट केले आहे.

हिंदी English

leave a reply