विमानातून सोडता येणारे युएव्ही संयुक्तरित्या विकसित करण्यासाठी भारत-अमेरिकेमध्ये करार

नवी दिल्ली – ‘एअर लॉन्च अनमॅन्ड एरियल व्हेईकल’ (एएलयुएव्ही) संयुक्तरित्या विकसित करण्यासाठी अमेरिका व भारतामध्ये करार झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातर्फे देण्यात आाली. अमेरिका-भारत संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकाराअंतर्गत (डीटीटीआय) हा करार झाल्याचे संरक्षण मंत्रालयाने अधोरेखित केले. भारत आणि अमेरिकेमधील संरक्षण सहकार्य पुढे घेऊन जाणार करार असल्याचा विश्‍वास भारताने व्यक्त केला आहे.

संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार महिनाभरापूर्वीच दोन्ही देशांनी ‘एएलयुएव्ही’ विकसित करण्यासाठी करार केला आहे. मात्र त्याबाबत आता जाहीर करण्यात आले आहे. भारत-अमेरिकेमधील डीटीटीआय कृतीगटाचे सहअध्यक्ष भारतीय वायुसेनेचे एअर व्हाईस मार्शल नर्मदेश्‍वर तिवारी आणि अमेरिकी वायुसेनेचे ब्रिगेडीयर जनरल आर. ब्रकबर यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार भारत आणि अमेरिका मिळून विमानाच्या सहाय्याने हवेतून सोडता येणारे मानवरहीत विमान विकसित करणार आहे.

‘एएलयुएव्ही’चे प्रोटोटाईप विकसित करण्यासाठी झालेल्या या कराराची अंमलबजाणी करण्याची जबाबदारी संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ), एअरोनॉटिक्स डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (एडीई) आणि एअर फोर्स रिसर्च लॅबोरेटोरीज (एएफआरएल) या तीन प्रमुख संस्थांवर आहे. तसेच या कामावर लक्ष्य ठेवण्याकरीता संयुक्त कृतीगट स्थापन करण्यात येणार आहे.

‘एएलयुएव्ही’ प्रोटोईप विकसित करण्यासाठी प्राथमिक 1.1 कोटी डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे. हे युएव्ही विकसित झाल्यास एखाद्या क्षेपणास्राप्रमाणे विमानातूनच युएव्ही सोडता येईल. यामुळे वायुसेनेची ताकद आणखी वाढेल. भारत आणि अमेरिकेत संवेदनशील संरक्षण तंत्रज्ञानाच्या संयुक्त विकास करण्यासाठी डीटीटीआय करार झाला होता. याअंतर्गत संयुक्तरित्या विकसित करण्याचा निर्णय झालेला हा महत्वाचा संरक्षण करार आहे.

leave a reply