भारत-अमेरिकेचा ‘युद्ध अभ्यास’ सुरू

‘युद्ध अभ्यास’बिकानेर – २७० अमेरिकी जवान, रणगाडे, लष्कराची चिलखती वाहने, हेलिकॉप्टर्सचा समावेश असलेला भारत आणि अमेरिकेतील ‘युद्ध अभ्यास’ हा लष्करी सराव सोमवारपासून सुरू झाला. राजस्थानच्या सुरतगड येथे हा युद्धसराव आयोजित करण्यात आला आहे. पुढील दोन आठवडे हा युद्धसराव सुरू राहणार आहे. राजस्थानच्या वाळवंटात गेल्या दोन महिन्यात होणारा हा दुसरा युद्धसराव आहे. याआधी भारत आणि फ्रान्सच्या लष्करात ‘पासेक्स’ युद्धसराव पार पडला होता.

२००४ साली भारत आणि अमेरिकेच्या लष्करामध्ये ‘युद्ध अभ्यास’ सराव सुरू झाला होता. या वार्षिक युद्धसरावाचे हे सोळावे वर्ष ठरते. गेल्या वर्षी या युद्धसरावाचे आयोजन अमेरिकेच्या सिटल येथील लष्करी तळावर करण्यात आले होते. दहशतवादविरोधी कारवाई तसेच इतर अंगांचा या युद्धसरावात सराव केला जातो. कोरोनाव्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर, सर्व कार्यक्रम पुढे ढकलले जात असताना लष्कराच्या या वार्षिक सरावाच्या वेळापत्रकात फारसा बदल झाला नाही. युद्ध अभ्यास ‘युद्ध अभ्यास’हा भारत आणि अमेरिकेतील सर्वात मोठा लष्करी प्रशिक्षण आणि सराव मानला जातो.

लष्कराच्या १७० इंफंट्री ब्रिगेडिचे कमांडर ब्रिगेडिअर मुकेश भानवाला यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैनिक यंदाच्या या युद्धसरावात सहभागी होत आहेत. या युद्धसरावात उभय देशांच्या लष्करात विचारांचे आदानप्रदान, संकल्पना आणि लष्कराच्या सरावावर भर देण्यात येणार असल्याची माहिती भारतीय लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल अमिताभ शर्मा यांनी दिली. द्विपक्षीय लष्करी सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी, परस्पर कार्यक्षमता वाढविण्यासाठी या युद्धसरावाकडे पाहिले जात आहे.

या युद्धसरावासाठी अमेरिकेच्या जवानांबरोबर ग्लोबमास्टर विमान तसेच अमेरिकन लष्कराची ‘स्ट्रायकर’ चिलखती वाहने देखील राजस्थान येथे दाखल झाली आहेत. तर भारताची रुद्र, एमआय-१७ आणि चिनूक हेलिकॉप्टर्स तसेच ‘बीएमपी-२’ लष्करी वाहने या युद्धसरावात पहायला मिळणार आहेत. या सरावात भारताचे किती सैनिक सहभागी होतील, ते स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण या युद्धसरावामुळे भारत आणि अमेरिकेतील लष्करी संबंध अधिक दृढ होतील, असा दावा केला जातो.

leave a reply