स्कॉर्पिन श्रेणीतील चौथी पाणबुडी ‘आयएनएस वेला’ नौदलाकडे सुपूर्द

- लवकरच नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार

मुंबई – ‘प्रोजेक्ट ७५’अंतर्गत उभारण्यात येणार्‍या स्कॉर्पिन क्षेणीतील सहा पाणबुड्यांपैकी चौथी पाणबुडी मंगळवारी नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. गेल्या दोन वर्षात या पाणबुड्याच्या सागरी चाचण्या पार पडल्या. कोरोनाकाळातही निर्बंध पाळून ‘आयएनएस वेला’च्या सागरी चाचण्या सुरू होत्या, अशी माहिती अधिकार्‍याने दिली. लवकरच औपचारीकरित्या ‘आयएनएस वेला’ नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात येणार आहे. यामुळे भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी वाढ होईल.

स्कॉर्पिन श्रेणीतील चौथी पाणबुडी ‘आयएनएस वेला’ नौदलाकडे सुपूर्द - लवकरच नौदलाच्या ताफ्यात दाखल होणारस्कॉर्पिन श्रेणीतील (कलवरी श्रेणीतील) सहा पाणबुड्यांच्य्या उभारणीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये करार झाला होता. फ्रान्सच्या तंत्रज्ञानावर आधारीत या पाणबुड्या गेल्या काही वर्षांपासून फ्रान्सच्या मेसर्स नेव्हल ग्रुपच्या सहाय्याने मुंबईतील माझगांव डॉकमध्ये उभारल्या जात आहेत. भारत आणि फ्रान्समध्ये यासाठी २००५ सालात करार झाला असला तरी विविध कारणांमुळे या ‘प्रोजेक्ट ७५’ काम रखडले होते. यामुळे २०१२ सालीच या सर्व पाणबुड्या बांधून पुर्ण होणे अपेक्षित असताना ही प्रतिक्षा वाढत गेली. चार वर्षांपूर्वी ‘प्रोजेक्ट ७५’अंतर्गत उभारण्यात येणार्‍या पाणबुड्यांच्या उभारणीला वेग देण्यात आला. त्यानंतर ‘आयएनएस खांदेरी’ व ‘आयएनएस करंज’ या पाणबुड्या भारतीय नौदल ताफ्यात दाखल झाल्या. तर ‘प्रोजेक्ट ७५’अंतर्गत उभारण्यात आलेली पहिली पाणबुडी ‘आयएनएस कलवरी’चे २०१५ मध्ये जलावतरण झाले होते, तर २०१७ सालातही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली.

स्कॉर्पिन श्रेणीतील चौथी पाणबुडी ‘आयएनएस वेला’ नौदलाकडे सुपूर्द - लवकरच नौदलाच्या ताफ्यात दाखल होणारयाच प्रकल्पाअंतर्गत उभारणी करण्यात आलेली ‘आयएनएस वेला’ या चौथ्या पाणबुडीचे मे २०१९ सालात जलावतरण झाले होते. त्यानंतर खडतर अशा सागरी चाचण्या पार पडल्यानंतर ‘आयएनएस वेला’ला मंगळवारी नौदलाला सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी व्हाईस ऍडमिरल नारायण प्रसाद, वेस्टर्न नेव्हल कमांडचे प्रमुख रिअर ऍडमिरल के.पी.अरविंदनसह नौदलाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘आयएनएस वेला’ अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. पाणबुडी युद्धतंत्रात ही पाणबुडी अतिशय प्रभावी ठरणार असल्याचा दावा केला जातो. या श्रेणीतील आणि ‘प्रोजेक्ट ७५’अंतर्गत उभारण्यात आलेली पाचवी पाणबुडी ‘आयएनएस वागिर’ या पाणबुडीचे नोव्हेंबर २०२० सालात जलावतरण झाले होते. या पाणबुडीच्या सध्या सागरी चाचण्या सुरू असून पुढील वर्षी ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारताच्या नौदल सामर्थ्यात वाढ करण्यासाठी झपाट्याने पावले उचलण्यात येत आहेत. सागरी क्षेत्रात सुरक्षेचे मोठे आव्हान पाहता नौदलाची भूमिकाही सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरते. त्यामुळे नौदलाला अत्याधुनिक युद्धनौका, पाणबुड्या व साहित्याने सज्ज केले जात आहे. आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेच्या चाचण्या नुकत्याच सुरू झाल्या आहेत.

leave a reply