२०३० सालापर्यंत भारताची सेवा निर्यात ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचेल

- वाणिज्यमंत्री पीयूष गोयल

नवी दिल्ली- २०३० सालापर्यंत सेवा क्षेत्रातील निर्यात एक ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे आणि हे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने भारत अग्रेसर आहे, असे वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात सेवा क्षेत्राचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. या सेवा क्षेत्राचा विस्तार कसा होईल आणि या क्षेत्रातील निर्यात कशी वाढेल यासाठी प्रयत्न केले. सेवा क्षेत्रातून निर्यात वाढावी यासाठी विविध देशांबरोबर मुक्त व्यापार करार (एफटीए) करताना सरकार वेगळी व्यवस्था करण्याच्या तयारीत असल्याचे वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी अधोरेखित केले. जगाचे बॅक ऑफीस असण्यापासून ब्रेन ऑफीस बनण्यापर्यंतचा प्रवास भारताने केल्याचे गोयल म्हणाले.

२०३० सालापर्यंत भारताची सेवा निर्यात ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचेल - वाणिज्यमंत्री पीयूष गोयल‘सर्व्हिस एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ग्लोबल सर्व्हिस कॉन्क्लेव्ह २०२१’मध्ये बोलताना वाणिज्यमंत्री गोयल यांनी सेवांच्या निर्यातीचे जागतिक केंद्र बनण्याची क्षमता भारतामध्ये असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. भारतात सेवा क्षेत्र हे सुमारे २.६ कोटी जणांना रोजगार उपलब्ध करून देते. तसेच एकूण निर्यातीत ४० टक्के वाटा हा सेवा क्षेत्राचा आहे. २०२०-२१ सालात सेवा क्षेत्राचा व्यापार हा आयातीपेक्षा ८९ अब्ज डॉलर्सने अधिक होता. तसेच गेल्या वीस वर्षात ५३ टक्के थेट परकीय गुंतवणूक याच क्षेत्रात आल्याची बाब वाणिज्यमंत्र्यांनी अधोरेखित केली.

भारतीय सेवा क्षेत्राला जागतिक मान्यता आणि जागतिक आकर्षण असे दुहेरी इंजिन लाभलेले आहे. कोरोना संकटाच्या काळात सर्व जगभरात सेवा क्षेत्रातील व्यापार कमी झाला. मात्र भारतात या क्षेत्राने अफाट लवचिकता दाखविली. त्यामुळे या क्षेत्रात मोठी घट दिसली नाही. तसेच संकटकाळ बाजूला सरताना या क्षेत्रातील उलढालही वेगाने पूर्वपदावर येत असल्याचे गोयल म्हणाले. भारताची अर्थव्यवस्थेची वाटचाल ही ऍसम्बली अर्थव्यवस्थेच्या जागी नॉलेज बेस अर्थव्यवस्थेकडे सुरू आहे. थोडक्यात केवळ दुसर्‍या देशांनी विकसित केलेली उत्पादने बनविणारी अर्थव्यवस्था नाही, तर स्वत: संशोधन करून तयार केलेल्या वस्तू व सेवांची निर्यात करणारी अर्थव्यवस्था बनत आहे, असे गोयल याकडे लक्ष वेधले. जगाचे बॅक ऑफीस असण्यापासून ब्रेन ऑफीस बनण्यापर्यंतचा प्रवास भारताने यशस्वीपणे केला आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगलसारख्या अनेक बड्या कंपन्यांची अमेरिकेबाहेरील सर्वात मोठी कार्यालये भारतात आहेत. यावरून भारताकडे जग विश्‍वासने बघत असल्याचे स्पष्ट होते, असे गोयल म्हणाले.

उच्चशिक्षण, ऑनलाईन प्रशिक्षण या क्षेत्रातही सेवा निर्यातीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. याशिवाय आरोग्य, पर्यटन, क्लाऊड गेमिंग या क्षेत्रातही निर्यात वाढीच्या संधी आहेत. भारत निरनिराळ्या देशांशी मुक्त व्यापार करार करीत आहे. यावेळी भारतीय सेवा क्षेत्रात निर्यात वाढीला चालना मिळेल अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. आसियान देश, आखाती देशात परिचारीका सेवेसाठी भारतातून सर्वाधिक परिचारीका जातात. आर्टिफीशियल इंटेलिजन्स (एआय), रोबो तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आपले कौेशल्य विकसित करीत आहे. याशिवाय माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात सेवा निर्यातीत आणखी कशी वाढ करता येईल याकडे या उद्योगाने लक्ष पुरवावे, असे आवाहन गोयल यांनी केले.

यावेळी त्यांनी भारत २०३० सालापर्यंत एक ट्रिलियन डॉलर्सच्या (७५ हजार अब्ज रुपये) सेवा निर्यातीचे लक्ष्य गाठेल, असा विश्‍वास व्यक्त केला. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात सेवा निर्यात २४० अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याची शक्यता आहे. २०२०-२१ सालात हीच निर्यात २०६ अब्ज डॉलर्स होती. याआधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यामध्ये तीन टक्क्यांची घट झाली होती. कोरोना संकटाचा परिणाम यावर दिसून आला होता.

leave a reply