आयएनएस विक्रांत देशाच्या दृढनिश्चयाचे प्रतिक आहे

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

vikrant-sixteenकोची – ‘आयएनएस विक्रांत’ केवळ युद्धनौका नाही. 21 व्या शतकातील भारताचे कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि दृढनिश्चयाचे प्रतिक आहे. ध्येय दूर असेल, त्याच्यासाठीचा प्रवास अतिशय मोठा असेल आणि या प्रवासात आव्हानेही मोठी असतील, तर त्याला भारताचे उत्तर आहे विक्रांत! ही युद्धनौका आत्मनिर्भर भारताचे प्रतिबिंब ठरते’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विमानवाहू युद्धनौकेच्या नौदलातील सहभागावर आनंद व्यक्त केला. त्याचवेळी पंतप्रधानांनी नौदलाचे नवे निशाण प्रदर्शित करून ते छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केले. यामुळे गुलामगिरीच्या इतिहासाचे चिन्ह बाजूला सारले जात असून देशाच्या आरमारी शक्तीचा वारसा सांगणारे नवे निशाण नौदलाला मिळाल्याचे पंतप्रधान म्हणाले.

स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे विमानवाहू युद्धनौका विकसित करणाऱ्या काही मोजक्या देशांच्या श्रेणीत आता भारताचाही समावेश झाला आहे. विशाल, विराट आणि विहंगम असलेली विक्रांत युद्धनौका म्हणजे तरंगता तळ किंवा तरंगते शहर आहे, असे सांगून या युद्धनौकेच्या सहभागामुळे भारताच्या नौदलाचे सामर्थ्य प्रचंड प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे हा दिवस ऐतिहासिक ठरतो. आधीच्या काळात इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षाविषयक आव्हानांकडे दुर्लक्ष केले जात होते.

पण आत्ताच्या काळात हे क्षेत्र देशासाठी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून त्याला विशेष प्राथमिकता दिली जात आहे. यासाठी नौदलासाठीच्या बजेटमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे. तसेच नौदलाच्या क्षमता विकसित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. शक्तीशाली भारतच शांतीपूर्ण व सुरक्षित विश्वाचा मार्ग प्रशस्त करील, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

Vikrantभारतीय नौदलाचे नवे निशाण प्रदर्शित करीत असताना, पंतप्रधानांनी हे निशाण छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करीत असल्याची घोषणा केली. आजवर आपल्या नौदलाकडे पारतंत्र्याच्या काळातील निशाण होते, पण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेपासून तयार झालेले निशाण देशाच्या सागरी व हवाई क्षेत्रात फडकत राहिल.

प्राचीन काळापासून भारत फार मोठी आरमारी शक्ती असलेला देश होता. इंग्रज भारतात आले, त्यावेळी ते भारताच्या आरमारी शक्तीला वचकून असायचे. म्हणूनच त्यांनी भारताच्या या शक्तीवर प्रहार केले होते. ब्रिटनच्या संसदेत भारताच्या जहाजांवर निर्बंध टाकणारे कायदे करण्यात आले होते, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली.

यावेळी बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी स्वातंत्र्याच्या अमृतकाळात नौदलात सहभागी झालेली विक्रांत पुढची 25 वर्षे देशाची सुरक्षा सुनिश्चित करील असा विश्वास व्यक्त केला. भारताच्या आकांक्षा आणि आत्मविश्वासाचे प्रतिक असलेली ही युद्धनौका सतत बदलत असलेल्या जागतिक परिस्थितीत भारताच्या व्यापार आणि सागरी हितसंबंधांचे संरक्षण करील, असे संरक्षणमंत्री पुढे म्हणाले. 1971 सालच्या युद्धात ‘आयएनएस विक्रांत’ युद्धनौकेने जबरदस्त पराक्रम केला होता. पण युद्धनौका कधीही मरत नाही, त्या विक्रांतचा हा नवा अवतार नौदलात सहभागी झाला असून त्यावेळच्या युद्धात पराक्रम गाजविणाऱ्या व बलिदान देणाऱ्या सेनानी आणि वीर सैनिकांना नव्या विक्रांतद्वारे आम्ही श्रद्धांजली अर्पण करीत आहोत, असे भावपूर्ण उद्गार यावेळी संरक्षणमंत्र्यांनी काढले.

दरम्यान, भारताच्या ताफ्यात आलेल्या या दुसऱ्या विमानवाहू युद्धनौकेमुळे देशाच्या सागरी हितसंबंधांची सुरक्षा करणे सोपे जाईल. चीनने आपल्या नौदलाची क्षमता वाढविण्यासाठी नव्या युद्धनौकांची उभारणी करण्याचा धडाका लावलेला असताना, भारताच्या ताफ्यात आयएनएस विक्रांतचा समावेश लक्षणीय बाब ठरते. यामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भारतीय नौदलाचा प्रभाव अधिकच वाढेल. तसेच हिंदी महासागर क्षेत्रात वर्चस्व गाजविण्याचे चीनचे स्वप्न यापुढे स्वप्नच राहिल, हे ही आयएनएस विक्रांतच्या सहभागामुळे उघड झाले आहे.

leave a reply