रशियन राष्ट्राध्यक्षांकडून वोस्तोक युद्धसरावाची पाहणी

russia vostock exercise putinमॉस्को – रशियाचा अतिपूर्वेकडचा भाग आणि ‘सी ऑफ जपान’मध्ये सुरू असलेल्या ‘वोस्तोक २०२२’ युद्धसरावाला रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी भेट दिली. गेल्या सहा महिन्यांपासून युक्रेनबरोबरचे युद्ध पेटलेले असताना, रशियाने हा भव्य युद्धसराव आयोजित करून रशियाने आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन केल्याची चर्चा जगभरात सुरू होती. त्यातच राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी या सरावाची पाहणी केल्याने या सरावाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

गेल्या गुरुवारी ५० हजार जवान आणि विनाशिका, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स, रणगाडे, लष्करी वाहने, तोफा अशा जवळपास पाच हजार ‘वेपन युनिट्स’सह ‘वोस्तोक २०२२’ युद्धसरावाची सुरुवात झाली. रशियासह माजी सोव्हिएत देश तसेच भारत, चीन, लाओस, मंगोलिया, निकारगुआ आणि सिरिया या देशांचे जवान व विनाशिका देखील सहभागी झाल्या आहेत. बुधवारपर्यंत पार पडलेला हा युद्धसराव रशियाच्या अतिपूर्वेकडच्या भागातील सात लष्करी तळांवर आणि शेवटचा टप्पा ‘सी ऑफ जपान’ जवळच्या सागरी क्षेत्रात पार पडला.

russia vostok military-exerciseगेल्या सहा महिन्यांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध पेटलेले आहे. या युद्धात रशियन लष्कराचे हजारो जवान लढत असून रशियन संरक्षणदलांची बरीचशी शक्ती इथे वापरली जात आहे. असे असले तरी युक्रेनच्या युद्धात गुंतलेला रशिया असहाय्य नाही. अजूनही आपल्याकडे प्रचंड प्रमाणात लष्करी क्षमता आहे, हे वोस्तोक २०२२ युद्धसरावाद्वारे रशियाने दाखवून दिले. युक्रेनच्या युद्धामुळे रशिया कमकुवत बनल्याचा दावा या सरावाद्वारे रशियाने खोडून काढला आहे.

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी देखील एकीकडे युक्रेनचे युद्ध सुरू असताना आपल्या आंतरराष्ट्रीय बैठका सुरू ठेवल्या होत्या. काही आठवड्यांपूर्वी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सेंट पीट्सबर्ग इकोनॉमिक फोरमला उपस्थित राहिले. तसेच माजी सोव्हिएत देशांचा दौरा करून इराण व तुर्कीच्या नेत्यांशी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी चर्चा केली होती. तर मंगळवारी वोस्तोक युद्धसरावाची पाहणी करण्यासाठी देखील राष्ट्राध्यक्ष पुतिन हजर होते. ‘सी ऑफ जपान’मध्ये सुरू असलेल्या या सरावात रशिया व चीनच्या विनाशिकांच्या अभ्यासाची पाहणी रशियन राष्ट्राध्यक्षांनी केली.

रशिया पाठोपाठ या युद्धसरावात चीनने सर्वाधिक जवान तसेच लढाऊ विमाने आणि विनाशिका रवाना केल्या आहेत. सी ऑफ जपानमधील सरावात रशिया व चीनच्या विनाशिका सहभागी झालेल्या असताना, रशियन राष्ट्राध्यक्षांनी हजेरी लावून चीनबरोबरचे आपले सहकार्य भक्कम असल्याचा संदेश दिल्याचा दावा पाश्चिमात्य माध्यमे करीत आहेत. रशिया व चीनच्या विनाशिकांनी सी ऑफ जपानमध्ये केलेल्या या युद्धसरावावर जपानने आक्षेप घेतला आहे. या युद्धसरावाकडे जपान अतिशय गांभीर्याने पाहत असल्याचे जपानच्या सरकारने बजावले आहे. या सरावामुळे सदर क्षेत्रातील तणाव वाढला आहे. त्याविरोधात जपान आवश्यक ती पावले उचलल्यावाचून राहणार नाही, असा इशारा जपानच्या सरकारने दिला आहे.

leave a reply