‘आयएनएसटीसी’मुळे व्यापारी वाहतूक गतीमान व विश्वासार्ह बनेल

- केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल

व्यापारी वाहतूकमुंबई – ‘इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर-आयएनएसटीसी’मध्ये इराणचे छाबहार बंदर अत्यंत महत्त्वाची भूमिक पार पाडेल. यामुळे मध्य आशियाई देश इराणमार्गे भारताशी व्यापारीदृष्ट्या जोडले जातील. व्यापारी वाहतुकीच्या क्षेत्रातील कंपन्यांनी इराणच्या छाबहार बंदर प्रकल्पातील शहीद बेहेश्ती बंदराचा अधिकाधिक वापर करावा. यामुळे व्यापारी वाहतूक अधिक सोपी, जलद, अधिक व्यवहार्य आणि विश्वासार्ह बनेल, असे भारताचे बंदर, जहाजबांधणी व जलमार्ग विभागाचे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या ‘शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-एससीओ’च्या बैठकीत चीन व पाकिस्तानने आपल्या सीपीईसी प्रकल्पाचे दाखले दिले होते. तर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी याच बैठकीत भारत इराणमध्ये विकसित करीत असलेल्या छाबहार बंदर प्रकल्पाचा उल्लेख करून चीन व पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. भारत विकसित करीत असलेल्या छाबहार बंदर प्रकल्पाबाबत इराण विशेष स्वारस्य दाखवित आहे. काही आठवड्यांपूर्वीच इराणने आपले हे बंदर रशिया तसेच मध्य आशियाई देशांबरोबरील भारताच्या व्यापारी वाहतुकीसाठ खुले करण्याची घोषणा केली होती.

ही घोषणा करून इराणने एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य केल्याचे दावे करण्यात येत आहेत. अणुप्रकल्पामुळे इराणची अमेरिका व इतर पाश्चिमात्य देशांनी कोंडी केली होती. अशा परिस्थितीत रशिया आणि मध्य आशियाई देशांमधील व्यापारासाठी इराणने छाबहार बंदर खुले करण्याची तयारी दाखवून आपले भौगोलिक व आर्थिक महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढविल्याचे दिसत आहे. काही पाश्चिमात्य विश्लेषक तसेच माध्यमांनी इराणच्या या निर्णयाचे रशिया व मध्य आशियाई देशांसह भारतालाही मोठे लाभ मिळतील, असा निष्कर्ष नोंदविला होता.

या पार्श्वभूमीवर, रविवारी मुंबईमध्ये ‘छाबहार डे’ नावाच्या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले हेोते. या कार्यक्रमाला कझाकस्तान, किरगिझिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान व उझबेकिस्तानचे राजदूत सहभागी झाले. तसेच इराणच्या बंदरे व आर्थिक व्यवहार विभागाचे उपप्रमुख जलिल इस्लामी, इराणचे महावाणिज्यदूत ए. एम. अली खानी, अफगाणिस्तानचे महावाणिज्यदूत झकिया वारडॅक उपस्थित हेोते. यामुळे इराणसह मध्य आशियाई देश देखील ‘आयएनएसटीसी’ प्रकल्पाला फार मोठे महत्त्व देत असल्याचे समोर येतआहे. यावेळी बोलताना भारताचे बंदर, जहाजबांधणी व जलमार्ग विभागाचे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सदर प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. बंदर उपलब्ध नसलेल्य देशांना ‘आयएनएसटीसी’चा मोठा लाभ मिळेल आणि यामुळे त्यांच्या व्यापारात वृद्धी होईल, असा विश्वास केेंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ‘आयएनएसटीसी’ प्रकल्पामुळे भारताच्या रशिया व मध्य आशियाई देशाबरोबरोबरील व्यापाराची स्थितीगती पालटून जाणार असून यामुळे भारताचा व्यापार प्रचंड प्रमाणात वाढणार असल्याचे दावे केले जातात. आत्तापर्यंत पाकिस्तानने व्यापारी मार्ग खुला न केल्याने भारताला ही व्यापारी संधी उपलब्ध झालेली नव्हती. पण आता आयएनएसटीसीमुळे पाकिस्तान भारताच्या या व्यापाराची अडवणूक करू शकणार नाही. यामुळे पाकिस्तानचे भौगोलिक महत्त्वच संपुष्टात येणार आहे. याची जाणीव झाल्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानने अफगाणिस्तान तसेच मध्य आशियाई देशांबरोबरील भारताच्या व्यापारासाठी मार्ग खुला करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण आता भारत पाकिस्तानच्या या प्रस्तावाकड दुर्लक्ष करीत असून भारताने आयएनएसटीसीकडे आपले लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे.

leave a reply