इटालियन जनतेमध्ये चीनच्या विरोधात तीव्र संताप

रोम – चीनच्या बेजबाबदारपणामुळे जगावर कोरोनाव्हायरसचे संकट कोसळले आहे, असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. याला आता जगभरातून दुजोरा मिळू लागला आहे. या साथीमुळे बारा हजार नागरिक गमावणारे इटलीमध्ये चीनच्या विरोधात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या साथीमुळे इटलीच्या झालेल्या नुकसानाची भरपाई चीनकडूनच वसूल करावी, अशी मागणी करून इटालियन जनतेने त्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

या नुकसानाची भरपाई चीनने करावी असे कोणाकोणाला वाटते असा प्रश्न करून इटालियन पत्रकार फ्रॉनिस्को मारीनो यांनी ही मोहीम सुरू केली. त्याला इटलीत फार मोठा प्रतिसाद मिळत आहे. चीनने या साथीबाबतची माहिती सुरुवातीच्या काळात दडवून ठेवली होती. म्हणूनच आज जगावर इतके मोठे संकट कोसळले आहे, असा दावा करून चीनला याची किंमत चुकती करण्यास भाग पाडण्याची मागणी ब्रिटनमध्येही सुरू झाली आहे. आता इटलीमध्येही याचे प्रतिबिंब उमटले असून पुढच्या काळात ही मोहीम अधिकच तीव्र होईल, असे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

अमेरिकेतही चीनने सुमारे २० ट्रिलियन डॉलरची नुकसान भरपाई मागणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. यामुळे या साथीसंदर्भातले चीनचे दडपण वाढत चालले आहे. चीनशी उत्तम संबंध असलेल्या इटलीच्या सरकारने आतापर्यंत आक्रमक भूमिका घेण्याचे टाळले होते. या साथीची तीव्रता वाढल्यानंतर ही इटालियन सरकारने उघडपणे चीनच्या विरोधात वक्तव्ये केली नव्हती. पण आता जनमताचा रेटा इटालियन सरकारला चीन विरोधात भूमिका घेण्यास भाग पाडू शकतो. इटलीमध्ये चीनची फार मोठी गुंतवणूक आहे. इटलीची राजधानी रोममध्ये चीनच्या अनेक कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे इटलीचे सरकार चीनच्या विरोधात भूमिका घेण्यास कचरत आहेत.

leave a reply