जपान-तैवानजवळील सागरी क्षेत्रात अमेरिका व चिनी युद्धनौकांच्या हालचाली तीव्र

बीजिंग – काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेच्या ‘मस्टिन’ युद्धनौकेने चीनच्या विमानवाहू युद्धनौका ‘लिओनिंग’ समोरच गस्त घातली होती. या कारवाईमुळे संतापलेल्या चीनने जपानच्या आखातातून लिओनिंगची गस्त पूर्ण करून तैवानच्या सागरी क्षेत्राजवळ युद्धसराव केला. आपल्या युद्धनौकेची ही कारवाई अमेरिकेसाठी इशारा असल्याचा दावा चीनच्या सरकारी मुखपत्राने केला. तर अमेरिकेच्या युद्धनौकेने आपल्या सरावात अडथळे निर्माण केल्याचा आरोप चीन करीत आहे.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चीनची लिओनिंग युद्धनौका आपल्या विनाशिकांच्या ताफ्यासह ईस्ट चायना सीच्या क्षेत्रात गस्त घालत होती. त्यावेळी अमेरिकेच्या नौदलाने एक फोटो प्रसिद्ध केला होता. यामध्ये अमेरिकेच्या ‘युएसएस मस्टिन’ या युद्धनौकेपासून अवघ्या एक मैल अंतरावरुन लिओनिंगने प्रवास केला होता. अमेरिकी युद्धनौकेचे कमांडर आणि सहाय्यक कमांडर आरामात पाय पसरून चिनी युद्धनौकेचा प्रवास पाहत असल्याचे या फोटोमध्ये दिसत होते.

अमेरिकेच्या नौदलाने प्रसिद्ध केलेला हा फोटो म्हणजे जाणीवपूर्वक प्रेरित केलेल्या युद्धाचा प्रकार ठरतो. चीनच्या धोक्याची अमेरिकेला फिकीर नसल्याचे संकेत अमेरिका या फोटोद्वारे देत असल्याचा दावा काही विश्‍लेषकांनी केला होता. मस्टिनची ही गस्त व सदर फोटोग्राफच्या प्रसिद्धीमुळे चीन चांगलाच अस्वस्थ बनला आहे. यानंतर अल्पावधीतच चीनच्या लिओनिंग युद्धनौकेने जपानच्या सागरी क्षेत्राजवळून प्रवास केला.

लिओनिंगने जपानच्या मियाकोच्या आखाताजवळून सेंकाकू द्विपसमुहाजवळ गस्त घातली. चीनच्या ग्लोबल टाईम्स या सरकारी मुखपत्राने याची माहिती दिली. सेंकाकू द्वीपसमुहावर जपानचे प्रशासन आहे. पण यावर आपला अधिकार असल्याचा दावा चीन करीत आहे. चीनच्या सेंकाकूवरील दाव्याच्या विरोधात जपानने आक्रमक भूमिका स्वीकारली असून अमेरिकेने जपानला पाठिंबा दिला आहे.

अशा परिस्थितीत, चीनच्या युद्धनौकेने जपानच्या या बेटाजवळून आणि मियाकोच्या आखातातून प्रवास करून जपानसह अमेरिकेलाही इशारा दिल्याचे चिनी मुखपत्राचे म्हणणे आहे. कारण मियाकोच्या आखाताजवळच जपानच्या ओकिनावा बेटावर अमेरिकेचा लष्करी तळ आहे. तर चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वू कियान यांनी लिओनिंग युद्धनौकेने तैवानच्या आखातातून पूर्ण केलेल्या गस्तीची माहिती देताना अमेरिकेवर टीका केली. लिओनिंग युद्धनौका चीनच्या सागरी हद्दीत गस्त घालत होती. अशावेळी अमेरिकेच्या मस्टिन युद्धनौकेने लिआनिंगच्या सरावावर पाळत ठेवून इथली सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोप कियान यांनी केला आहे. चीनच्या या आरोपांवर अमेरिकेच्या नौदलाकडून कुठल्याही स्वरुपाची प्रतिक्रिया आलेली नाही.

leave a reply