मेक्सिको सीमेववरून होणारी घुसखोरी हे 9/11च्या हल्ल्यानंतरचे अमेरिकी सुरक्षेवरील सर्वात मोठे संकट

Mexico borderवॉशिंग्टन – मेक्सिको सीमेवरून होणारी घुसखोरी हे 9/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतरचे अमेरिकेच्या सुरक्षेसमोरील सर्वात मोठे संकट असल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाने केला. अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने सीमाभागावरील नियंत्रण गमावले असून अंतर्गत सुरक्षा विभागाचे प्रमुख अलेजांड्रो मायोर्कस यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणीही रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत 72 तासांच्या अवधीत 16 हजार निर्वासितांनी घुसखोरी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

ज्यो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर निर्वासितांसंदर्भातील नियम शिथिल केले असून घुसखोरांना उघड मोकळीक दिली आहे. त्यामुळे अमेरिकेत दर महिन्याला लाखो निर्वासित घुसखोरी करीत असून यापूर्वीचे सर्व विक्रम मोडले गेले आहेत. टेक्सास प्रांतात घुसखोरांची समस्या सोडविण्यासाठी आणीबाणी लागू करण्यात आली असून ‘नॅशनल गार्ड’ची पथके तैनात करण्यात आली आहेत. मेक्सिको सीमेला जोडून असलेल्या काही प्रांतांनी निर्वासितांचे लोंढे राजधानी वॉशिंग्टन व न्यूयॉर्क यासारख्या शहरांमध्ये पाठविण्यास सुरुवात केली आहे.

andy biggs-Mexico borderअमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये प्रतिनिधीगृहावर रिपब्लिकन पक्षाने नियंत्रण मिळविले असून सीमेवरील घुसखोरीच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकी यंत्रणांनी सीमेवरील नियंत्रण गमावले असून त्यासाठी बायडेन प्रशासनाची धोरणे व अंतर्गत सुरक्षा विभाग जबाबदार असल्याचा ठपका रिपब्लिकन सदस्यांनी ठेवला आहे. याची जबाबदारी घेऊन सुरक्षा विभागाचे प्रमुख असलेल्या मायोर्कस यांना बडतर्फ करावे, अन्यथा त्यांच्याविरोधात संसदेत ठराव आणण्याचा इशारा रिपब्लिकन सदस्यांनी दिला आहे.

रिपब्लिकन पक्षाचे नेते अँडी बिग्ज्‌‍ यांच्यासह 20 संसद सदस्यांनी यासंदर्भात मागणी केली असून सीमेवरील संकट हे 9/11च्या हल्ल्यानंतरचे सर्वात मोठे संकट असल्याचा आरोप केला. निर्वासितांच्या घुसखोरीमुळे अमेरिकेच्या विविध प्रांतांमध्ये गुन्हेगारी वाढल्याकडेही संसद सदस्यांनी लक्ष वेधले. 2022 साली अमेरिका-मेक्सिको सीमेवर जवळपास 10 कोटी डॉलर्सचे अमली पदार्थ पकडण्यात आल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. या वर्षात अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांची संख्या तब्बल 60 लाखांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

हिंदी English

leave a reply