राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून आदेश मिळाल्यास इराणवर कारवाई करू

- अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख

इराणवर कारवाईवॉशिंग्टन – ‘इराण अणुबॉम्बनिर्मितीच्या जवळ पोहोचला आहे. इराणकडे कमी वेळेत अणुबॉम्बची निर्मिती करण्याची क्षमता असून राजनैतिक आघाडीवरील चर्चा अपयशी ठरली तर इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी अमेरिकेकडे इतरही पर्याय आहेत. पण त्यासाठी बायडेन प्रशासनाच्या आदेशांची आवश्यकता आहे’, अशी घोषणा अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल केनिथ मॅक्केन्झी यांनी केली. अमेरिकेने इराणसंबंधी नियुक्त केलेले विशेषदूत रॉब मॅली यांनी इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लादण्याचे संकेत दिले.

अणुप्रकल्पांच्या देखरेखीसंबंधी इराणबरोबरील चर्चा अपयशी ठरल्याचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या प्रमुख राफेल ग्रॉसी यांनी काही तासांपूर्वी जाहीर केले. इराण आणि अणुऊर्जा आयोगाच्या अधिकार्‍यांमध्ये झालेल्या बैठकीत वादग्रस्त मुद्यांवर चर्चा पार पडली. पण इराणबरोबर एकमत न झाल्यामुळे सदर चर्चा अनिर्णित राहिल्याचे सांगून ग्रॉसी यांनी त्यावर नाराजीचा सूर लावला होता. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने याची दखल घेऊन इराणवर टीका केली. तरीही सोमवारपासून व्हिएन्ना येथे सुरू होणार्‍या चर्चेत सहभागी होणार असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले होते.

इराणवर कारवाईपण अमेरिकेच्या ‘सेंटल कमांड-सेंटकॉम’च्या प्रमुखांनी याबाबत वेगळीच भूमिका मांडली. ‘राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या मते, इराण अण्वस्त्रसज्ज होणार नाही. यासाठी राजनैतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पण सेंट्रल कमांडकडे नेहमीच निरनिराळ्या योजना तयार असतात. आम्हाला आदेश मिळाले तर नक्कीच त्या अंमलात आणू शकतो’, अशा स्पष्ट शब्दात सेंटकॉमचे प्रमुख जनरल मॅक्केन्झी यांनी लष्करी कारवाईचा इशारा दिला. तर इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत बोलताना जनरल मॅक्केन्झी यांनी चिंता व्यक्त केली.

इराण अणुबॉम्बनिर्मिती अगदी समिप पोहोचला आहे. असे असले तरी इराणने प्रत्यक्ष अणुबॉम्ब बनविण्याचा निर्णय घेतलेला नाही. पण आवश्यकता निर्माण झालीच तर कमी वेळेतही अणुबॉम्ब बनविण्याची तयारी इराणने केली आहे’, असे सांगून इराणच्या अणुप्रकल्पात प्रगत तंत्रज्ञान असल्याचे संकेत मॅक्केन्झी यांनी दिले. सेंटकॉमचे प्रमुख इराणला लष्करी कारवाईचा इशारा देत असले तरी बायडेन प्रशासनातील नेते व अधिकारी अजूनही इराणवरील लष्करी कारवाईला विरोध करीत आहेत.

बायडेन प्रशासनाने इराणबरोबरच्या वाटाघाटीसाठी नियुक्त केलेले विशेषदूत रॉब मॅली यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना इतर पर्यायांमध्ये निर्बंधांचा उल्लेख केला. इराणने अणुकरारा संबंधित वाटाघाटीतून माघार घेतली तर कठोर आर्थिक निर्बंध लादले जातील, असे बजावले. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील आण्विक वाटाघाटी फिस्कटल्या तर इराणवर कारवाईसाठी इतर पर्यायांचा विचार केला जाईल, असे म्हटले होते. पण लष्करी कारवाईचा यात समावेश नसेल, असे स्पष्ट केले होते.

सोमवारपासून व्हिएन्ना येथे इराणबरोबर अणुकराराबाबतच्या वाटाघाटी सुरू होत आहेत. २०१५ सालचा अणुकरार पुनर्जिवित करण्यासाठी बायडेन प्रशासन तयार आहे. पण अमेरिकेने इराणबरोबर अणुकरार केला तरी इस्रायल या कराराशी बांधिल नसेल, असे इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी जाहीर केले आहे. इराणच्या अणुप्रकल्पांवर कारवाई करण्याची घोषणा इस्रायलने दिले आहेत.

चीन इराणला साथ देणार – चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई

बीजिंग – ‘देशांतर्गत व्यवहारांमधील हस्तक्षेप व एकतर्फी कारवाई रोखण्यासाठी चीन इराणला साथ देईल. आंतरराष्ट्रीय न्याय आणि नि:पक्षपातीपणाच्या सुरक्षेसाठी चीन-इराणमधील हे सहकार्य महत्त्वाचे ठरेल’, अशी घोषणा चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी केली.

चीन आणि इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये व्हर्च्युअल चर्चा पार पडली. यामध्ये चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व यांचा इतर देशांना आदर करावा, असे म्हटले. त्याचबरोबर अमेरिकेने इराणवर लादलेले निर्बंध पूर्णपणे माघारी घ्यावे, असे आवाहन परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी केले. इराणने आपल्या अधिकारांबाबत केलेल्या मागण्या वैध असून व्हिएन्ना येथील वाटाघाटींमध्ये यावर गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली आहे.

leave a reply