लंडन – गेल्या नऊ आठवड्यांपासून आपल्या देशात सुरू असलेल्या निदर्शनांकडून जगाचे लक्ष हटविण्यासाठी इराण कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्डकपवर हल्ला करू शकतो. या हल्ल्याबरोबर कतारसह आखातात अस्थैर्य माजविण्याचा इराणचा इरादा आहे, असा इशारा इस्रायली लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख मेजर जनरल अहरोन हलिवा यांनी दिला. इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी मेजर जनरल हलिवा यांच्या या दाव्याला दुजोरा दिला.
इराणमध्ये सुरू असलेली निदर्शने अपवादात्मक असल्याचे मेजर जनरल हलिवा यांनी ‘इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल सिक्युरिटी स्टडीज्-आयएनएसएस’ या अभ्यासगटाच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले. ‘इराणमधील या निदर्शनांनी बंडाचे रुप घेतले आहे. निदर्शकांवरील हल्ले आणि यात निदर्शकांचा जाणारा बळी, हे आता सामान्य इराणींसाठी राष्ट्रीय अस्मितेचा विषय ठरत आहेत. आंतरराष्ट्रीय निर्बंध, राजकीय दबाव आणि कठोर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या इराणच्या राजवटीसाठी ही निदर्शने आव्हान ठरू लागली आहेत’, याकडे मेजर जनरल हलिवा यांनी लक्ष वेधले.
‘आखातातील इतर देश स्थिर असताना, आपल्या देशातील अस्थैर्य इराणला बोचत आहे. त्यामुळे इराणमधील अस्थैर्य ज्याप्रमाणे वाढत जाईल, त्याबरोबर फुटबॉल वर्ल्ड कपवरील हल्ल्याची शक्यताही वाढेल. इराण अतिशय आक्रमकपणे या स्पर्धेवर हल्ला चढवील आणि कतारसह आखातात अस्थैर्य निर्माण करील’, असे इस्रायली लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी स्पष्ट केले. या हल्ल्यानंतर कतारची प्रतिक्रिया काय असेल, यामुळे इराणने स्पर्धेवरील हल्ला रोखून ठेवल्याचा दावा मेजर जनरल हलिवा यांनी केला.
इस्रायल-इराण थेट संघर्षाची शक्यता
मेजर जनरल हलिवा
येत्या काळात इराणबरोबर थेट संघर्षाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इस्रायली लष्कराने याची पूर्ण सज्जता ठेवावी, असा इशारा लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख मेजर जनरल हलिवा यांनी दिला. त्याचबरोबर सिरियामधील इराणच्या एजंट्सचा जसा बंदोबस्त केला, अगदी त्याचप्रमाणे या क्षेत्रातील इराणच्या एजंट्सविरोधी कारवाईची तयारीही करावी, असे हलिवा यांनी सुचविले.
दरम्यान, इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख लेफ्टनंट जनरल अविव कोशावी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांची भेट घेतली. तसेच इराणविरोधी कारवाईचा वेग वाढविण्यावर अमेरिका व इस्रायलचे एकमत असल्याची माहिती कोशावी यांनी दिली.