सिरियातील बॉम्बस्फोटात इराणच्या लष्कराचा कर्नलपदावरील अधिकारी ठार

इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप करून इराणची धमकी

syria blastतेहरान/दमास्कस – सिरियन राजधानी दमास्कसजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात इराणच्या लष्करातील ‘कर्नल दाऊद जाफरी’ या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा बळी गेला. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सने आपल्या संकेतस्थळावर याची माहिती दिली. तसेच या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या इस्रायलला याची मोठी किंमत चुकवावी लागेल, अशी धमकी इराणने दिली. सिरियातील हल्ल्यांबाबत मूग गिळून गप्प बसण्याची भूमिका स्वीकारणाऱ्या इस्रायलने याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण या स्फोटात इराणने आपला मोठा अधिकारी गमावल्याचे दिसत आहे.

syria irgc colonel khamenieसिरियाच्या वेगवेगळ्या भागात आत्तापर्यंत झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणचे जवान व इराणसंलग्न संघटनांचे दहशतवादी मारले गेले आहेत. गेल्याच आठवड्यात हमा व होम्स प्रांतातील हल्ल्यात इराणच्या ताब्यातील शस्त्रास्त्रांचे कोठार उद्ध्वस्त झाले होते. तर इराणसंलग्न संघटनेचे दहशतवादी ठार झाल्याचा दावा सिरियातील मानवाधिकार संघटनेने केला होता. सिरियातील अस्साद राजवटीने या हल्ल्यांसाठी इस्रायल जबाबदार असल्याचा ठपका ठेवला होता. इराणने या हल्ल्यांसाठी इस्रायलला धमकावले नव्हते.

पण सोमवारी सिरियन राजधानी दमास्कसजवळील भागात रस्त्यावर झालेल्या स्फोटात कर्नल दाऊद जाफरी वरिष्ठ अधिकारी ठार झाले. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे वरिष्ठ अधिकारी असलेले कर्नल जाफरी सिरियातील मोहिमेत सल्लागाराची भूमिका पार पाडत होते. त्याचबरोबर कर्नल जाफरी रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍समध्ये एअरोस्पेस विभागात क्षेपणास्त्र निर्मितीचे काम पाहत होते. तर कर्नल जाफरी हे इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्या मर्जीतील होते. त्यामुळे कर्नल जाफरी या हल्ल्यात ठार झाल्यामुळे इराणला मोठा हादरा बसल्याचा दावा केला जातो.

syria irgc colonel killedइराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी आपल्या अधिकाऱ्याच्या हत्येसाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. तसेच कर्नल जाफरी यांची हत्या घडवून इस्रायलने गंभीर गुन्हा केला आहे. याची मोठी किंमत इस्रायलला चुकवावी लागेल, अशी धमकी रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सने दिली. इराणमधील लष्कराशी संलग्न असलेल्या संकेतस्थळाने ही माहिती दिली. इराण सिरियाचा वापर करून इस्रायलवर ड्रोन हल्ले चढवू शकतो किंवा पर्शियन आखातातून प्रवास करणाऱ्या इस्रायली कंपनीच्या जहाजांवर हल्ले चढवू शकतो, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

गेल्या ११ वर्षांपासून सिरियामध्ये गृहयुद्ध भडकले आहे. या संघर्षाच्या आडून इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटना सिरियाचा वापर इस्रायलविरोधी कारवायांसाठी केला जाईल, असे इस्रायलने बजावले होते. सिरियातील या इराणच्या कारवाया रोखण्यासाठी इस्रायलने रशियाला आवाहन केले होते. यानंतरही सिरियातील इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या कारवाया इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू लागल्या, तर थेट सिरियात घुसून हल्ले चढविण्याची धमकी इस्रायलने दिली होती. त्यानंतरच्या काळात इस्रायलने सिरियामध्ये ४०० हून अधिक हल्ले चढविल्याचा दावा केला जातो. पण इस्रायलने या हल्ल्यांची अधिकृतस्तरावर जबाबदारी स्वीकारलेली नाही.

leave a reply